वंडर्स पार्कमध्ये नियम धाब्यावर

नवी मुंबई : आटोक्यात आलेल्या कोरोनाने शहरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. परंतु पालिकेच्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये येणार्‍या नागरिकांना मात्र मास्क, तसेच सुरक्षा नियमांचा विसर पडला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांनी गर्दी करणे टाळणे, मास्क वापरणे आदी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नवी मुंबई महापालिकेचे नेरूळ सेक्टर 19 येथील वंडर्स पार्क कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद होते. शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांकडून पार्क सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार 3 फेब्रुवारीपासून वंडर्स पार्क खुले करण्यात आले आहे. या पार्कच्या प्रवेशद्वारावर, तसेच आतील भागात ‘नो मास्क, नो एंट्री’चे फलक लावण्यात आले आहेत. परंतु पार्कमध्ये येणार्‍या नागरिकांना मास्कचा विसर पडत असून, पार्कमध्ये गर्दी केली जात आहे. यावर महापालिका प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, महापालिका प्रशासनाने यावर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. प्रवेशद्वारावर तपासणीची सोय नाही वंडर्स पार्कमध्ये शहरातील, तसेच शहराबाहेरील नागरिक, लहान मुले मोठ्या संख्येने येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेशद्वारावर थर्मल गनने पार्कमध्ये प्रवेश करणार्‍यांच्या शरीराचे तापमान मोजणे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांची तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र, अशी कोणतीही सोय प्रवेशद्वारावर उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.