आयुक्तांच्या पुनर्पाहणीतून स्वच्छता कामांना वेग

नवी मुंबई ः स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून त्यामध्ये सातत्य राखले जायलाच हवे या सूत्रानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने सकाळी लवकरच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विभागांना भेटी देत असून अगदी गल्लीबोळात जाऊन तेथील स्वच्छता कामांची पाहणी करीत आहेत. त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच संबंधित सर्व घटक स्वच्छतेविषयी अधिक सतर्क झाले आहेत.

सुरूवातीला आठही विभागांचे क्षेत्रवार दौरे केल्यानंतर त्या पाहणीमध्ये आढळलेल्या स्वच्छताविषयक सूचनांच्या अनुषंगाने त्याबाबत करण्यात आलेल्या पूर्ततेची पुनर्तपासणी आता आयुक्त स्वत: त्या भागांना पुन्हा भेटी देत करीत आहेत.  आजही आयुक्तांनी सकाळीच बेलापूरगावापासून सुरूवात करीत सेक्टर 15, सेक्टर 11, सागरविहार परिसर, खाडीकिनारा, सेक्टर 1, सेक्टर 1 ए, मँगो गार्डन, मार्केट, सेक्टर 8, 9, संभाजीनगर, रमाबाई आंबेडकर नगर, सेक्टर 4 तसेच नेरूळ सेक्टर 23, सेक्टर 19, आर.आर.पाटील उद्यान, सेक्टर 21, स्टेट बॅक कॉलनीमधील खतप्रक्रिया प्रकल्प, सेक्टर 15, शिवाजीनगर, एम.आय.डी.सी. भाग, त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर 5, सेक्टर 14, हेगडे भवन, सेक्टर 15, सेक्टर 16, भवानी मार्केट, झेन गार्डन, सेक्टर 4, सेक्टर 3, सेक्टर 2, सेक्टर 1, समतानगर, समतानगर येथील घनकचरा प्रकल्प, ऐरोली तलाव अशा विविध ठिकाणी भेटी देत स्वच्छतेच्या अनुषंगाने पाहणी केली. या सर्व भागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची आयुक्तांनी स्वत: पाहणी करून स्वच्छतेबाबत खात्री करून घेतली व प्रत्येक शौचालयाठिकाणी स्वच्छतेविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी लावलेल्या क्यू आर कोड सिस्टिमचा वापर करून आपल्या मोबाईलवरून अभिप्रायही नोंदविले. सकाळच्या वेळेत सार्वजनिक शौचालयात असणारी वर्दळ लक्षात घेऊन त्याठिकाणच्या केअरटेकरने मॉप हातात घेऊन उभे राहून ते सतत स्वच्छ ठेवलेच पाहिजे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी परिमंडळ उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि अमरिश पटनिगीरे यांना दिले. प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या शहराचा स्वच्छ शहर नावलौकीक मागील वर्षीच्या देशातील तिसर्‍या नंबरवरून यावर्षी पहिल्या नंबरवर नेण्यासाठी शहर स्वच्छतेमधील आपली जबाबदारी शहराविषयीच्या प्रेमाने पार पाडावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.