लॉजिस्टिक पार्क भूसंपादनाला विरोध

सिडको विरोधात आठगाव शेतकरी संस्थेचा उठाव            

पनवेल ः उरण तालुक्यातील बेलोंडाखार प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक संस्था आठगाव, मौजे चिरले, गावठाण आणि जांभुळपाडा यांच्यावतीने रविवारी चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका दीपक मढवी यांच्या नेतृत्वाखाली सिडकोला विरोध दर्शवत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी जोरदार विरोध दर्शविला. त्याचप्रमाणे गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करून नियमीत करावी तसेच त्यांना सिडकोने सनद द्यावी, तसेच चिरले, गावठाण, जांभुळपाडा, साईनगर यांना वाढीव गावठाण विस्तार द्यावा, सिडकोने आम्हाला 22.5% टक्के देण्यापेक्षा

शिवडी सेतू बाधितांना शासनाने 23 लाख गुंठा भाव दिला आहे त्याप्रमाणे आजच्या बाजारभावाप्रमाणे प्रति गुंठा 50 लाख रुपये सर्व प्रकल्पबधितांना द्यावे अन्यथा आमच्या जमिनी आम्ही विकसित करून आम्हीच त्याठिकाणी बांधकाम करू अशी जोरदार मागणी करत सिडकोच्या दलालीची आम्हाला गरज नाही असा आक्रमक पवित्राही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी घेतला. सिडकोच्या लॉजिस्टीक पार्कच्या भूसंपादन प्रक्रियेला चिरले ग्रामपंचायतीचा पूर्णपणे विरोध असून सिडकोने जर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मात्र प्रकल्पग्रस्त मोठे आंदोलन उभे करतील मग हौतात्म्य स्वीकारावे लागले तरी बेहत्तर असा इशारा चिरले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक मढवी यांनी दिला.