करवाढी विरोधात विरोधी पक्षाची निदर्शने

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निषेध

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांनी नागरिकांवर लादलेल्या जाचक कराविरोधात 22 मार्च रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने केली. तसेच जोपर्यंत पालिका मालमत्ता कराबाबत विशेष सभा आयोजित करत नाही तो पर्यंत पालिकेच्या कुठल्याही सभेत विरोधी पक्षाचे सदस्य हजेरी लावणार नाही अशी भूमीका देखील घेतली. जर पुढच्या 10 दिवसांमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली नाही तर महाविकास आघाडीतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका घेतल्यानंतर महापौरांनी येत्या आठ दिवसात सभा लावणार असल्याचे सांगितले.

मालमत्ता करवाढ संदर्भात 17 जानेवारी 2019 रोजी 46-25 या बहुमताने मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याला महाविकास आघाडीच्या 25 नगरसेवकांनी विरोध केला होता. महानगरपालिका हद्दीत पाच वर्षे कोणताही नवीन दर लागू नये अशी भूमिका महाविकास आघाडीने त्यावेळी घेतली होती आणि आजही घेतलेली आहे. कर वाढीला नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात विरोध आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष सभागृहात कर दरवाढीला मंजुरी देतो आणि दुसरीकडे दरवाढ कमी करू असे सांगितले जाते. त्यामुळे सत्ताधार्‍यांकडून दुटप्पी भूमिका मांडली जाते. नागरिकांच्या समस्यांशी सत्ताधार्‍यांना काही देणेघेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने (महाविकास आघाडी) दरवाढीविरोधात निदर्शने केली. सत्ताधारी पक्षातील सदस्य ऑनलाईन सभेला गुपचुप येऊन बसतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कोण करणार ? विरोधी पक्ष जेव्हा जनतेचे प्रश्न मांडते तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांचा आवाज म्यूट केला जातो. जनतेशी संबंधित असलेले प्रश्न मांडता येत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेली पीठासीन अधिकारी यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. कर वाढीबाबत सत्ताधारी दुटप्पी भूमिका मांडत असल्याचा आरोप करण्यात आला.  

जनतेशी संबंधित विषय असल्याने महापौरांनी महाविकास आघाडीच्या सदस्यासोबत चर्चा करने आवश्यक होते. मात्र पीठासीन अधिकारी म्हणून जो अधिकार आहे, त्याचा वापर करून त्यांनी वेळ मारून नेली. नवीन कर लावू नये अशी आमची मागणी आहे असे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सांगितले. कर वाढ विरोधात नागरिकांचा आक्रोश आहे. नवीन कोणताही कर लावू नये अशी महाविकास आघाडीची ठाम भूमिका आहे. यावेली डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, गोपाळ भगत, प्रज्योति म्हात्रे, रवी भगत, कमल कदम, प्रिया भोईर, विष्णू जोशी, अरुणा दाभने, उज्वला पाटील, ज्ञानेशवर पाटील, गणेश कडू, शंकर म्हात्रे, सतीश पाटील, विजय खानावकर, मंजुळा कातकरी आदी उपस्थित होते.