खारघर गावचे रुपडे पालटणार

11 कोटी 38 लाखांच्या विकासकामाला मंजुरी

पनवेल : स्मार्ट शहर असलेल्या खारघरला ज्या गावावरुन ओळख मिळाली ते गाव आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. पालिकेच्या स्थापनेपासून खारघर गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून खारघर गावाच्या विकासासाठी पालिकेने सुमारे 11 कोटी 38 लाखांच्या विकासकामाला मंजुरी दिल्याने खारघर गाव स्मार्ट होणार आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातदेखील खारघर गावाचा विकास खुंटला होता. खारघर गावावरून शहराला नाव मिळाले असले तरी हे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले. प्रवीण पाटील यांनी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपददेखील भूषविले आहे. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामांना चालना मिळाली. लवकरच त्या ठिकाणच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवातदेखील होणार असल्याने खारघर गाव खर्‍या अर्थाने स्मार्ट होणार आहे. खारघर गावात ग्रापंचायतीचे कार्यालय असूनदेखील गावात मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या नव्हत्या. या सर्व कामांना सुरुवात होणार असून ग्रामस्थांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने या कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमध्ये गावांमध्ये विद्युत व्यवस्था, जलकुंभ उभारणे, मुख्य जलवाहिनी टाकणे, विद्युत यांत्रिकी कामे, वाहिन्या जोडणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, भुयारी गटारे बांधणे, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदींचा समावेश आहे. यासाठी 11 कोटी 38 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

ही कामे होणार
विद्युत व्यवस्थेसाठी 1 कोटी 17 लाख, 5 लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यासाठी 1 कोटी 93 हजार, मुख्य जलवाहिनी 15 लाख रुपये, विद्युत यांत्रिकी कामे 9 लाख 98 हजार, मलनिःसारण वाहिन्या जोडणे (बाहेरील ) 51 लाख 82 हजार , मलनिःसारण वाहिन्या जोडणे (घराजवळ) 88 लाख 42 हजार, रस्ते 2 कोटी 18 लाख, पावसाळी गटारे 2 कोटी 5 लाख, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे यासाठी 2 कोटी 23 लाख खर्च केले जाणार आहेत.