तीन दिवसांत तीन लाखांची दंडवसूली

10 ऑगस्ट ते 23 मार्च एकुण 1 कोटी 33 लाखाहून अधिक दंडवसूली

नवी मुंबई ः कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून वैयक्तीक आणि सामाजिक आरोग्याला बाधा पोहचविणार्‍या बेजबाबदार नागरिकांना समज म्हणून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विशेष दक्षता पथकांनी आपल्या कारवाईस धडाकेबाज सुरूवात केलेली असून 21 ते 23  मार्च या तीन दिवसात 1120 जणांकडून वसूल केला 3 लक्ष 48 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. 10 ऑगस्टपासून 31364 जणांवरील कारवाईतून 1 कोटी 33 लाखाहून अधिक दंडवसूली करण्यात आली आहे. 

कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने नवी मुंबईही नियम कठोर करण्यात आले असून नियमांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाया अधिक प्रभावीपणे करण्यासाठी 155 जणांचा समावेश असणारी विशेष दक्षता पथके सर्व विभागांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली असून प्रत्येक पथकात 5 कर्मचारी अशा 31 पथकांमार्फत कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर धडक कारवाई केली जात आहे. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्राकरिता सकाळी 1 व रात्री 1 अशी 2 पथके त्याचप्रमाणे कोरोना प्रसारचा संभाव्य धोका असणार्‍या एपीएमसी मार्केटकरिता 5 पथके सकाळ, दुपार, रात्र अशा तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. या विशेष दक्षता पथकांनी आपल्या कारवाईस धडाकेबाज सुरूवात केलेली असून 21 ते 23 मार्च अशा तीनच दिवसात 1120 जणांवर कारवाई करीत 3 लक्ष 48 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. तसेच या 10 ऑगस्ट पासून 23 मार्चपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मास्क, सुरक्षित अंतर, थुंकणे अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या 31364 जणांकडून एकूण 1 कोटी 33 लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये आधीची पोलीसांसह नियुक्त दक्षता पथके सद्यस्थितीत कार्यरत आहेतच. याव्यतिरिक्त मुख्यालय स्तरावरून परिवहन व्यवस्थापक यांच्या नियंत्रणाखीली नियुक्त ही विशेष दक्षता पथके यांचेमार्फत विभागांतील लग्न व इतर समारंभांतील संख्या मर्यादा तसेच रेस्टॉरंट, बार याठिकाणी कोरोना नियमांचे पालन होते की नाही यावरही बारीक लक्ष असणार असून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या विशेष दक्षता पथकांमार्फत प्रभावी कामगिरी केली जाणार आहे.