अखंडीत व योग्य दाबाने पाणीपुरवठयाबाबत दक्षता घ्या

पालिका आयुक्तांची एमआयडीसीला सूचना

नवी मुंबई ः मागील काही दिवसांपासून एम.आय.डी.सी. मार्फत कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्यामुळे विविध माध्यमांतून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने महानगरपालिका, एम.आय.डी.सी. व सिडको यांच्या पाणीपुरवठा विभागाच्या उच्च अधिकार्‍यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करून एम.आय.डी.सी. मार्फत होणारा पाणीपुरवठा कमी होणार नाही व वारंवार खंडीत होणार नाही याबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसी कडून 70 द.ल.लि. पाणी घेतले जात असून त्याचे वितरण घणसोली, ऐरोली, दिघा व एम.आय.डी.सी. क्षेत्रातील काही निवासी भागात केले जात आहे. तसेच खारघर, कळंबोली, कामोठे अशा सिडको क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या मोरबे धरणाचे पाणी दिले जात आहे. याविषयी सविस्तर माहिती घेत आयुक्तांनी नवी मुंबईतील ज्या भागात एम.आय.डी.सी. कडून घेतला जाणारा पाणीपुरवठा दिला जात आहे तेथील नागरिकांना योग्य दाबाने पुरेसे पाणी नियमितपणे उपलब्ध व्हावे याची काळजी घेण्याचे सूचित करतानाच आपल्या शहरात आपले पाणी ही भूमिका स्पष्ट करीत एम.आय.डी.सी. भागातील पाईपलाईन महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या पाईपलाईनवर स्थलांतरित करण्याबाबत मोरबे धरण, जलउदंचन केंद्र ते प्रत्यक्ष पाणीपुरवठा करावयाचे क्षेत्र येथील जलवितरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास दिले. त्याचप्रमाणे भविष्यातील पाण्याचे महत्व जाणून एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योगसमुहांमध्ये महानगरपालिकेच्या टर्शअरी ट्रिटमेट प्लान्टमधील पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरण्यासाठी एम.आय.डी.सी. ने पुढाकार घ्यावा असे सूचित केले.

स्वत:च्या मोरबे धरणामुळे जलसमृध्द स्वयंपूर्ण महानगरपालिका असा लौकीक असणार्‍या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना मोरबे धरणाचेच पाणी मिळण्याकरीता तसेच सद्यस्थितीत नागरिकांना पाण्याची कोणत्याही प्रकारची अ़डचण भासू नये याकरिता आयुक्त अभिजीत बांगर आग्रही असून त्यादृष्टीने नियोजनबध्द कृतीशील पावले उचलण्यात येत आहेत. या बैठकीस नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता  सुरेंद्र पाटील, एम.आय.डी.सी.चे कार्यकारी अभियंता मारूती कलकुटकी, सिडकोचे अधिक्षक अभियंता प्रणीक मूल आणि इतर अधिकारी उपस्थित होते.