पालिका कर्मचार्‍यांकरिता विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या अधिक्षक ते लिपिक अशा वर्ग तीनच्या कर्मचार्‍यांची दैनंदिन कार्यालयीन कामकाजाविषयीची माहिती अद्ययावत व्हावी व ते करीत असलेले काम नियमानुसार परीपूर्ण असावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेतील वर्ग 3 कर्मचार्‍यांकरिता यशदा, पुणे यांच्या वतीने राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत 25 व 26 मार्च या कालावधीत दोन दिवसीय विशेष प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करीत प्रत्येक विभागातील प्रातिनिधिक कर्मचा-यांच्या उपस्थितीत या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज महापालिका मुख्यालय इमारतीतील ज्ञानकेंद्रात शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले आणि प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी भेट देऊन कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाचे महत्व विशद केले व प्रोत्साहित केले. यशदा, पुणे यांच्या वतीने मास्टर ट्रेनर जी.टी. महाजन हे या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये आज प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती, महाराष्ट्र नागरी सेवा नियम-रजा, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम, निवृत्ती वेतन या विषयांवर त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. उद्याच्या सत्रात ते कार्यालयीन व्यवस्थापन अंतर्गत पत्रलेखन, टिप्पणी लेखन / नस्ती व्यवस्थापन, सहा गठ्ठे पध्दती या विषयावर भाष्य करणार असून समस्या निराकरण व सर्जनशीलता सत्रात ते प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांशी चर्चा करणार आहेत. याप्रसंगी वन प्रशिक्षण संस्था शहापूर यांच्या संचालक एस.एम.आडगांवकर उपस्थित होत्या. कोणतेही कामकाज करीत असताना सुयोग्य कार्यप्रणालीची सतत उजळणी होणे व अद्ययावत राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका वर्ग 3 कर्मचार्‍यांसाठी हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आगामी काळात अशाप्रकारे सर्वच संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.