प्रतिनियुक्ती न करता पदोन्नतीने भरती करा

काँग्रेसच्या इंटक युनियनची मागणी ; प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : पालिकेत येणार्‍या काळात रिक्त होणारी  पदे ही प्रतिनियुक्तीवर न भरता पालिका अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन भरावीत अशी मागणी काँग्रेसचे इंटकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सावंत यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोनपैकी एका अतिरिक्त आयुक्तपदी पालिकेतीलच अधिकार्‍यांची नियुक्ती करावे यासाठी ते आग्रही आहेत. प्रशासनाने मागणीकडे दूर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे.  

 नगरविकास विभागाकडील 19 ऑक्टोबर 2020 चा निर्णयानुसार महापालिका आस्थापनेवर मंजूर पदांच्या अतिरिक्त आयुक्त 50 टक्के, उप आयुक्त संवर्गातील 50 टक्के, सहा. आयुक्त संवर्गातील 50 टक्के पदे, मुख्याधिकारी सवंर्गातून प्रतिनियुक्तीने भरण्याची तरतूद आहे. या व्यतिरिक्त अन्य पदे प्रतिनियुक्तीने भरता येणार नाही असे असतानाही सरकारकडून मंजूरी नसलेल्या संवर्गातून अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्तांपासून उपलेखापाल पर्यंत अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने येवून येथील कर्मचार्‍यांच्या हक्काच्या पदोन्नतीच्या जागा अडवत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आस्थापनेत काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवरील अन्याय दूर करण्याची मागणी रविंद्र सांवत यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

राज्य सरकारने महापालिकेला दोन अतिरीक्त आयुक्त पदांना मंजूरी दिली आहे. यातील एक अतिरीक्त आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाते. उर्वरीत अतिरीक्त आयुक्त पदावर महापालिकेच्या संवर्गातून नियुक्ती करण्यास नगरविकास विभागाने मंजूरी दिली आहे. असे असतानाही मागील काही वर्षांपासून दोन्ही जागांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांची नियुक्ती होत असल्याने पालिकेतील स्थानिक अधिकार्‍यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.  यातच भर म्हणून महापालिका परिवहन उपक्रमातील अधिकारी कर्मचारी यांनी महापालिका आस्थापनेकडील अग्निशमन विभागप्रमुखांपासून, वाहनचालक पर्यंतची पदे प्रतिनियुक्तीने भरलेली आहेत. नवी मुंबई महापालिका आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्त संवर्गातील दोन पदापैंकी एक पद सेवाज्येष्ठतेनुसार महापालिका उप आयुक्त संवर्गातून पदोन्न्नतीने/ तदर्थ नेमणूक देवून त्वरीत भरण्यात यावे असेही त्यांनी नमुद केले आहे. या मागणीनुसार अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

निवेदनातील ठळक मुद्दे 

  • नजिकच्या काळात रिक्त होणारे शहर अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (डॉ. कटके  यांच्यावरील अन्याय दूर करून) जनसंपर्क अधिकारी ही सर्व पदे महापालिका आस्थापनेवरील सेवा ज्येष्ठ अधिकारी कर्मचार्‍यांमधून पारदर्शक पध्दतीने रितसर पदोन्नतीने विहित नियमाने भरण्यात यावी.
  • नियमबाह्य प्रतिनियुक्ती किंवा अतिरिक्त कार्यभार दिलेली अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, अग्निशमन विभाग प्रमुख, सहा. आयुक्त, उप लेखापाल, वाहनचालक परिवहन उपक्रम इ. शासकीय अधिकारी यांना शासनाकडे व मनपा अधिकारी/ कर्मचारी असल्यास तात्काळ कार्यमुक्त करून संबंधित विभागाकडे वर्ग करावे.
  • प्रत्येक विभागासाठी आकृतीबंधात मंजूर केलेल्या संख्येप्रमाणे कर्मचार्‍यांचे वाटप करण्यात यावे. बदल्यांच्या नियमाप्रमाणे एकाच विभागात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या प्रथम तात्काळ बदल्या करण्यात याव्यात व तद्नंतर 33 टक्के कर्मचार्‍यांच्या दरवर्षी बदल्या करण्यात याव्यात.