ग्रँड सेट्रल, इनॉर्बिट मॉलला 50 हजार दंड

नवी मुंबई ःअँटिजेन टेस्टशिवाय अथवा अहवालाची विचारणा केल्याशिवाय नागरिकांना प्रवेश देणार्‍या सीवूडस येथील ग्रँड सेट्रल तसेच वाशीतील इनॉर्बिट मॉलवर प्रत्येकी 50 हजारांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना आठवड्याच्या अखेरीस मॉलमध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने असलेली संख्या नियंत्रणात आणणे व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी 4 वाजल्यापासून शनिवार व रविवार पूर्ण दिवस मॉलच्या प्रवेशव्दाराजवळ अँटिजेन टेस्ट करण्यास 26 मार्चपासून प्रारंभ करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोव्हीड चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल अथवा मागील 72 तासांमधील निगेटिव्ह कोव्हीड चाचणी अहवाल सादर केला तरच मॉलमध्ये प्रवेशाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबतच्या कार्यवाहीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सीवूड नेरूळ येथील ग्रँड सेंट्रल मॉल तसेच वाशी येथील इनॉर्बिट मॉलला अचानक भेट दिली असता त्यांना त्याठिकाणी अँटिजेन टेस्टशिवाय अथवा अहवालाची विचारणा केल्याशिवाय नागरिकांना प्रवेश दिला जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार विशेष दक्षता पथकांमार्फत तातडीने कार्यवाही करीत ग्रँड सेंट्रल मॉल आणि इनॉर्बिट मॉल या दोन्ही मॉल व्यवस्थापनांकडून प्रत्येकी 50 हजार रूपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.