जेएनपीटीने केले आंतरटर्मिनल मार्गाचे उद्घाटन

टर्मिनल दरम्यान कंटेनर वाहतूकीचे अंतर होणार कमी 

उरण : अखंडित व सुगम व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने जेएनपीटीने आपल्या सर्व चार कंटेनर टर्मिनल्सना बीएमसीटी टर्मिनलशी जोडणारा नवीन आंतर टर्मिनल मार्ग तयार केला आहे. या नवीन मार्गाचे  उद्घाटन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)चे अध्यक्ष संजय सेठी यांनी केले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ, सर्व विभागप्रमुख, जेएनपीटी टर्मिनल ऑपरेटर व अन्यभागधारक उपस्थित होते.

यापूर्वी जेएनपीटीमध्ये कंटेनर ट्रेलर्सना जेएनपीटी मधील टर्मिनलमधुन बीएमसीटी टर्मिनलमध्ये जाण्यासाठी 5 कि.मी. चे अंतर पार करावे लागत होते. आता हा नवीन मार्ग तयार झाल्याने हे अंतर कमी होऊन अडीच कि.मी.झाले आहे. या मार्गाचा उपयोग बीएमसीटी आणि जेएनपीटीच्या इतर टर्मिनल्स दरम्यान केवळ ट्रान्सशिपमेंट व आयटीआरएचओ (इंटरटर्मिनलरेलहँडलिंगऑपरेशन) कंटेनरच्या वाहतुकीसाठीच केला जाणार आहे ज्यामुळे ट्रान्सशिपमेंट व आयटी आरएचओ कंटेनरची वाहतुक सुलभ आणि अविरत सुरू राहील.

आयटीआरएचओचे (इंटरटर्मिनलरेलहँडलिंगऑपरेशन)उद्दीष्ट जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांची हाताळणी करणे, रेल्वे मार्गाची उत्पादकता, कार्यक्षमता, किफायतशिर माल हाताळणीमध्ये वाढ करणे, आयसीडी कंटेनरचे इम्पोर्ट ड्वेल टाईम कमी करणे, एक्सपोर्ट आयसीडीकंटेनर संबंधितटर्मिनलला वेळेत पाठविणे आणिजेएनपीटीमध्ये रेल्वे सेवेच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे आहे. या नवीन मार्गामुळे व्यापार वर्गाला लाभ होणार आहे, कारण नवीन मार्गामुळे रेल्वेद्वारे मिश्र स्वरूपात आलेले निर्यात कंटेनर कोणत्याही टर्मिनलवर उभ्या असलेल्या जहाजावर वेळेवर चढवण्यात येतील व जेएनपीटी मध्ये अधिक रेल्वेगाड्यांची हाताळणी केली जाईल.

एकूणच या नवीन मार्गामुळे जेएनपीटी मध्ये कंटेनर वाहतूकीमध्ये रेल्वेचा वाटा व ट्रान्सशिपमेंट कंटेनरची संख्या वाढणे अपेक्षित आहे. याप्रसंगी  संजय सेठी म्हणाले, अंतर्गत टर्मिनलमार्गाच्या उद्घाटनामुळे जेएनपीटी बंदरातील इतर चार कंटेनर टर्मिनल्स व बीएमसीटी दरम्यान रेल्वे कंटेनरची वाहतुक सुलभ होईल व बंदराच्या कार्यक्षमतेतसुद्धा वाढ होईल. जेएनपीटीने ईझ ऑफ डूइंग बिझिनेस’अंतर्गत इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामुळे आयात-निर्यात समुदायाच्या वेळेची व खर्चाची बचत होण्यास मदत झाली आहे.