द्रोणागिरी आणि कळंबोलीतील कोविड रुग्णालयांचे लोकार्पण

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-लोकार्पण

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील पनवेल व उरण परिसरातील कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी सिडको महामंडळातर्फे अल्पावधीत कळंबोली, सेक्टर-5ई आणि सिडको प्रशिक्षण केंद्र, द्रोणागिरी येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड समर्पित रुग्णालयांचे 2 एप्रिल 2021 रोजी एकनाथ शिंदे, मंत्री, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांच्या शुभहस्ते दूरस्थ पद्धतीने ई-लोकार्पण करण्यात आले. 

नवी मुंबईच्या पनवेल व उरण परिसरातील वाढत्या कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता अल्पावधीत सुसज्ज असे कोविड-19 समर्पित रुग्णालय उभारण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनातर्फे सिडकोला देण्यात आले होते. त्यानुसार सिडकोने तातडीची कार्यवाही करत कळंबोली, सेक्टर-5ई येथील समाज मंदिरात यापूर्वी कार्यरत असलेले पनवेल महानगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, महिला बचतगट इ. स्थलांतर करून अवघ्या 30 दिवसांत 60 ऑक्सिजनयुक्त खाटा आणि 12 अतिदक्षता खाटांसह एकूण 72 खाटांचे अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे कोविड-19 समर्पित रुग्णालय उभारले. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सिडकोकडून एकूण रु. 5 कोटी खर्च करण्यात आला. या रुग्णालयात पेशंट फ्लो अशा रीतीने निर्धारित करण्यात आला आहे की, जेणेकरून त्या ठिकाणी काम करणार्‍या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. याकरिता स्पर्शरहित प्रणालीही तयार करण्यात आली आहे. याशिवाय, आयसीयु व्हेंटिलेटर, हाय फ्लो नेजल कॅन्युला, सेंट्रली डिस्ट्रिब्युटेड ऑक्सिजन फॅसिलिटी, एक्सरे, सीआर सिस्टीम आणि रुग्णांसाठी स्पर्शरहित देखरेख या सुविधाही येथे उपलब्ध आहेत. 

सदर रुग्णालयाच्या पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर ऑक्सिजनयुक्त एकूण 60 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 800 लिटरच्या सिलेंडरची व अतिरिक्त 6 सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयासाठी लागणार्‍या निकषांप्रमाणे अग्निशमन प्रणालीही उपलब्ध केली आहे. रुग्ण व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि हाय स्पीड इंटरनेट लीज लाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांसाठी प्रत्येक मजल्यावर गरम पाणी तसेच आरओ/युव्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णांची सुरक्षा व्यवस्था, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व अन्य पायाभूत सुविधा पनवेल पालिकेच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर कोविड-19 समर्पित रुग्णालय/केंद्राचे 2 एप्रिल 2021 रोजी पनवेल महानगरपालिकेस संचालनासाठी हस्तांतरण करण्यात आले.  याशिवाय सिडकोतर्फे द्रोणागिरी येथील सिडको प्रशिक्षण केंद्रामध्ये 50 ऑक्सिजनयुक्त खाटांचे कोविड-19 समर्पित रुग्णालय अवघ्या 25 दिवसांमध्ये उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीकरिता सिडकोकडून रु. 73 लक्ष खर्च करण्यात आला असून सदर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना हस्तांतरण करण्यात आले आहे.