मालमत्ता करापोटी 540 कोटीहून अधिक रक्कम जमा

19891 मालमत्ताकरधारकांनी घेतला अभय योजनेचा लाभ

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या मालमत्ता  कर अभय योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ नवी मुंबईकर नागरिकांनी घेतला. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेत मालमत्ताकरापोटी 540 कोटी 66 लक्ष 13 हजार 742 इतकी रक्कम जमा झालेली आहे. 19891 मालमत्ताकर धारकांनी अभय योजनेचा लाभ घेत 159 कोटी जमा केले आहेत. 

कोव्हीड काळातील लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रातील लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. याचा विचार करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर अभय योजना लागू करत नागरिकांना दिलासा दिला होता. कोव्हीड काळ असूनही मालमत्ताकरातूनच नागरी सुविधांची परिपूर्ती केली जाते याची जाणीव ठेवून नवी मुंबईकर नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करून चांगला प्रतिसाद दिला आहे.

अभय योजनेचा विचार करावयाचा झाल्यास 15 डिसेंबर ते 15 मार्च पर्यंत थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सूट व 16  मार्च ते 31 मार्च या कालावधीत 50 टक्के सूट देण्यात आली होती. याचा लाभ घेत 78 कोटी 86 लक्ष 63 हजार 759 इतक्या रक्कमेची सवलत अभय योजनेअंतर्गत नागरिकांना मिळालेली आहे. त्यामुळे अभय योजनेअंतर्गत प्रत्यक्ष जमा रक्कम व अभय योजनेअंतर्गत सूट मिळालेली रक्कम यांचा एकत्रित विचार करता 238 कोटी 2 लक्ष 93 हजार 352 इतक्या रक्कमेची अभय योजनेअंतर्गत अप्रत्यक्ष वसूली झाली आहे.

यामध्ये 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीतील अभय योजनेचा लाभ घेत 19891 मालमत्ताकर धारकांनी 159 कोटी 16 लक्ष 29 हजार 593 इतकी रक्कम अभय योजनेअंतर्गत जमा केलेली आहे. विशेष म्हणजे 30 व 31 मार्च या अखेरच्या दिवशी मालमत्ताकरापोटी 46 कोटी 42 लक्ष 79 हजार 185 इतकी रक्कम महानगरपालिकेमध्ये जमा झालेली आहे. 

माहे डिसेंबर 2020 पर्यंत 140 कोटी इतकी रक्कम मालमत्ताकरापोटी जमा झाली होती. त्यापुढील 3 महिन्यात 400 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे. एकूणच 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेत मालमत्ताकरापोटी 540 कोटी 66 लक्ष 13 हजार 742 इतकी रक्कम जमा झालेली आहे. कोव्हीड कालावधी असूनही नियमित मालमत्ताकर भरण्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून मालमत्ताकर अभय योजनेसही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे.