अँटीजेन टेस्ट केली तरच एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश

नवी मुंबई : एपीएमसी बाजारपेठेत अँटीजेन टेस्ट केल्याशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई परिसरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असून एपीएमसी मार्केटमधील संचालक, सचिव आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची  लागण झाली आहे. तर एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. तरी पाचही मार्केटमध्ये होत असलेली गर्दी कमी होताना दिसत नाही. काही व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहक मास्क वापरत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाच्यावतीने नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री सुरु करण्यात आली आहे.

एपीएमसी प्रशासनाच्या वतीने सॅनिटायजिंग करणे, मास्क वापरणे बंधनकारक, आणि सामाजिक अंतर पाळणे यासाठी विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. तर बाजार आवाराशी संबंधित सर्व घटकांना 7 एप्रिल पर्यंत अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

बाजार समितीतील संबंधित घटकांनी अँटीजेन टेस्ट केली नसल्यास त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. तर मास्क न वापरणार्‍यांसाठी दंडाची रक्कम तीनशे ऐवजी पाचशे करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न करत असून सध्या केलेल्या उपाययोजनांमुळे आम्हाला मदत होईल. तर बाजार आवारातील सर्व घटकांनी एपीएमसी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सभापती अशोक डक यांनी केले.

  • अडीच महिन्यांत 18 हजार जणांवर कारवाई
  •  नवी मुंबईत शासन आणि महापालिका प्रशासन यांनी जे मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यावर पोलीस प्रशासनाकडून लोकांचे प्रबोधन करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. 
  • अडीच महिन्यात नियम मोडणार्‍या 18000 जणांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे. काही जणांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.