वाशीत साकारतेय डॉगपार्क

नवी मुंबई ः वाशीतील सेक्टर 8, वीर सावरकर उद्यान येथे नवी मुंबईतील पहिल्या डॉगपार्कचे काम सुरु करण्यात आले आहे. उद्यानातील एका बाजूला 870 चौरस मीटर क्षेत्रात डॉगपार्क करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 26 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबईत अनेक प्रकल्प उद्यास येत असून यामुळे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. शहरात सेंट्रल पार्क, वंडर पार्क, ज्वेल्स ऑफ नवी मुंबई अशी मोठी उद्याने असून ती विरंगुळ्याची व लहानग्यांसाठी खेळण्याची दर्जेदार ठिकाण म्हणून नावारुपाला आली आहेत. आता नवी मुंबईत डॉगपार्क प्रकल्प उद्यास येत आहे. वाशी सेक्टर 8, वीर सावरकर उद्यान येथे डॉगपार्कचे काम सुरु करण्यात आले आहे. उद्यानातील एका बाजूला 870 चौरस मीटर क्षेत्रातील निसर्गाला त्रास न देता डॉग पार्क करण्यात येईल. जेथे मोठे आणि लहान कुत्र्यांसाठी खेळण्याचे उपकरणे स्थापित केली जाणार आहेत. यामुळे प्राणी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच येथील स्थानिक माजी नगरसेविका  दिव्या गायकवाड यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले आहेत.