नवी मुंबईत 4096 कन्टेनमेंट झोन

कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी

नवी मुंबई ः कोव्हीडचा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र शासन नियमावलीनुसार योग्य प्रकारे निश्चित करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेले आहेत. याकामी त्यांना संबंधित नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य असणार आहे. सध्या नवी मुंबई पालिका क्षेत्रात 4096 प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. 

ज्या इमारतीमध्ये एक वा पाचपेक्षा कमी रूग्ण आढळतात असा फ्लॅट किंवा मजला अथवा संपूर्ण इमारत तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार प्रवेश प्रतिबंधित केली जात असून हे पहिल्या श्रेणीचे म्हणून घोषित करण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी बैठ्या स्वरूपातील एका शेजारी एक अशी जवळजवळ घरे असतील अशा वसाहती / वस्तीमध्ये एखादा रूग्ण आढळल्यास त्या रूग्णाच्या घराच्या दोन्ही बाजूची घरे दुसर्‍या श्रेणीच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात येतात. त्याचप्रमाणे जवळपासच्या भागात / सोसायटीमध्ये 5 पेक्षा अधिक रूग्ण सापडलेल्या तिसर्‍या प्रकारचे प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ते क्षेत्र ये-जा करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करता येईल अशाप्रकारे बॅरेकेटींग लावून कन्टेनमेंट झोन बनविण्यात येतात. या प्रतिबंधित क्षेत्रातील ये-जा पूर्णपणे थांबविणे कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याने विशेषत्वाने गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या दरवाज्याबाहेर विलगीकरण कालावधी नमूद केलेला फलक लावण्यात येत असून त्याची माहिती संबंधित सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनाही देण्यात येत आहे.

अशा व्यक्तींनी घराबाहेर पडणे पूर्णत: प्रतिबंधित असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कोव्हीड सुरक्षेचे नियम पाळून करणेविषयी सोसायटी / संबंधित विभाग कार्यालयामार्फत पुरवठादार जोडून देण्याची व्यवस्था केली जात आहे. कोरोनाबाधित व्यक्तीने त्याचे घर सोडून बाहेर यावयाचे नसून याविषयीची जबाबदारी सोसायटी पदाधिकारी यांच्यावरही देण्यात आलेली आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणार्‍या 4 व्यक्तींवर एफ.आय.आर.नोंदविण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या प्रकारचे 3055, दुसर्‍या प्रकारचे 1040 व तिसर्‍या प्रकारचा 1 अशी प्रतिबंधित क्षेत्रे असून त्याची संबंधित विभाग कार्यालयामार्फत नागरी आरोग्य केंद्राच्या सहयोगाने योग्य प्रकारे अंलबजावणी केली जात आहे.