एपीएमसी भाजीपाला मार्केट 24 तास सुरु राहणार

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास एपीएमसीमध्ये होणारी गर्दी काही प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. भाजी मार्केट मध्ये 700 गाड्यांची आवक होत असल्याने सकाळच्या वेळेस 8 ते 10 हजार लोकांची एकाच वेळी गर्दी होत आहे. यामुळे कोरोना नियमांना हरताळ फासला जात आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्र आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची येथे आवक होत असते. गर्दी विभागण्यासाठी 8 तासांऐवजी आता 24 तास भाजीपाला मार्केट सुरू राहणार आहे. पहाटे 2 वाजता सुरू होणारे भाजीपाला मार्केट उद्यापासून संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून भाजीपाला घेऊन येणार्‍या गाड्यांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रात्री 10 वाजता व्यापारी वर्गाकडून व्यापार सुरू झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरात भाजीपाला पोहोचवणार्‍या गाड्यांना प्रवेश मिळणार आहे. येथील पाच मार्केटमध्ये  दिवसाला 7 ते 8 हजार गाड्यांची आवक आणि जावक होत असते. त्यामुळे हजारोच्या संख्येने माथाडी कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर, खरेदीदारांचा एपीएमसी मध्ये राबता असतो. 

एपीएमसीमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग नवी मुंबईसोबतच महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता असल्याने एपीएमसीमध्ये येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. यासाठी अँटिजन टेस्ट सुविधा गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यास याचा मोठा फायदा कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी होण्याची शक्यता आहे.