बेलवली येथील मंगल कार्यालयाला 10 हजारांचा दंड

पनवेल : ब्रेक दि चैनच्या अधिसूचनेनुसार कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पनवेल परिसरात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वारदोली ग्रामपंचायत हद्दीत परवानगीशिवाय लग्नासाठी कार्यालय उपलब्ध करून दिले म्हणून बेलवली येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय (धर्मा चाहू पाटील) यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पनवेल तालुक्यात पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशानुसार ब्रेक दि चेनच्या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणत्याही मंगल कार्यालयाने किंवा नागरिकांनी परवानगीशिवाय विवाह सोहळा, साखरपुडा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम साजरे करू नये तसेच लग्न सोहळ्यासाठी 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी घेण्याचे आवाहन तहसीलदार विजय तळेकर यांनी केले आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात सर्रासपणे कोरोनाचे नियम पायदळी तुडवून हळदी व लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अनेक ठिकाणी वेळोवेळी सांगूनही मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचे वापर केले जात नाही. त्यामुळे कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पनवेल परिसरात शासनाने कोविड संदर्भात आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पनवेल तहसील मार्फत कारवाई करण्यासाठी पाच पथके नेमण्यात आलेली असल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली.

ब्रेक द चेनच्या अनुषंगाने कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे.
- विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल