पनवेल पालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन

पनवेल ः करप्रणालीविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या सभेत आम्हाला ऑफलाइन हजेरी लावू द्या, या मागणीवरून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ केल्याप्रकरणी 15 नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. अडीच तास सुरू असलेल्या गोंधळ नाट्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने निलंबित नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

करप्रणालीला नगरसेवक आणि नागरिकांकडून झालेल्या विरोधामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे सत्ताधार्‍यांनी विशेष सभा घेण्यास सहमती दाखवल्यानंतर 5 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. ऑनलाइन सभेत आमची मते व्यक्त करताना तांत्रिक अडचणी येतात, आम्हाला आमची मते योग्य पद्धतीने मांडता येत नाहीत, असा आरोप करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी परवानगी नसताना सभागृहात अडीच वाजता प्रवेश केला. महापौरांनी सुरुवातीलाच सदस्यांना ऑफलाइन उपस्थित राहण्यास परवानगी नसल्यामुळे सभागृहात थांबू नये, कराविषयक महत्त्वाची बैठक घेण्यासाठी नगरसेवकांनी सहकार्य करावे, अशी मागणी केली. मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ही बाब न ऐकता ते मागणीवर ठाम राहिले. विरोधी पक्षाचे नगरसेवक गणेश कडू यांनी सभेत कोणी उपस्थित रहावे, याबाबत शासनाचे कोणतेही परिपत्रक नाही, त्यामुळे विशेष सभा म्हणून सभागृहात उपस्थित राहून आम्हाला आमची भूमिका मांडू द्या, असा आग्रह धरला होता. त्यामुळे 10 मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. मात्र तरीदेखील नगरसेवक सभागृहाबाहेर पडण्यास नकार देत असल्यामुळे सभा दोनदा तहकूब केल्यानंतर निलंबनाचा इशारा देण्यात आला. पाच मिनिटांचा अवधी देऊन 15 नगरसेवकांचे निलंबन करण्याचा निर्णय पीठासन अधिकारी म्हणून महापौरांनी जाहीर केला. निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये शंकर म्हात्रे, गणेश कडू, उज्वला पाटील, विष्णू जोशी, प्रज्योती म्हात्रे, गोपाळ भगत, रवींद्र भगत, सारिका भगत, प्रीती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, कमल कदम, प्रिया भोईर, ज्ञानेश्वर पाटील हे शेकापचे 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय खानावकर आदींचा समावेश आहे.

भाजपच्या लीना गरड यांचे निलंबन
कराला विरोध करण्यासाठी खारघर फोरमच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका घेणार्‍या लीना गरड सोमवारी कराला उघड विरोध करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसोबत हजर राहिल्या होत्या. सिडकोने विकास केलेल्या शहरांमध्ये महापालिकेने कोणताही विकास केलेला नाही. मग तुम्ही कसला कर घेता म्हणून नागरिकांची भूमिका मांडण्यासाठी मी सभागृहात आल्याचे लीना गरड यांनी सांगितले.