टाळेबंदीच्या भीतीने बाजारात खरेदीसाठी झुंबड

पनवेल : गुरुवारनंतर राज्य सरकार लॉकडाऊन जाहीर करण्याच्या शक्यतेने पनवेलच्या रायगड बाजारपेठेत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. पंधरा ते आठ दिवसांच्या खाद्यपदार्थ, भाजीपाला व किराणा माल भरणार्‍यांची झुंबड झाल्याने मालाची आवक कमी असल्याचे कारण देत अनेक व्यापार्‍यांनी छापील किमतीपेक्षा अधिकचे दर लावून खाद्यपर्दार्थाची विक्री केली.

शनिवार- रविवार बंद असल्याने रायगड बाजारात दिवसाला 12 ते 13 गाड्या भरून पालेभाज्यांची आवक झाली होती. शुक्रवारनंतर सोमवारी रायगड बाजार सुरू झाल्याने व सोमवार-मंगळवारनंतर टाळेबंदीची अफवा असल्याने बाजारात 70 गाडया भरून पालेभाजींचा माल येऊनही सुमारे पाच हजार नागरिकांनी पालेभाजी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. दरदिवशी रायगड बाजारातील व्यवहार दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत संपतात मात्र 70 गाड्यामधील माल हातोहात विक्री झाल्याने दुपारी 12 वाजताच बाजार बंद झाला. बाजारात शिरण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत त्यावर नेहमी नियंत्रणासाठी रखवालदार असतात, मात्र गर्दीचे प्रमाण ध्यानात घेऊन बाजारातील चारही प्रवेशद्वारे उघडण्यात आली. मात्र नागरिकांच्या रांगा कल्पतरू गृहनिर्माण सोसायटीचा मार्ग, शेकाप कार्यालयापर्यंतचा मार्ग, पंचरत्न हॉटेलपर्यंतचा मार्ग, भारत गॅसचे दुकानार्प्यतचा मार्ग आणि उरण नाक्यार्प्यतचा मार्ग या सर्व मार्गावर नागरिकांनी रांगा लावून बाजारात खरेदीसाठी प्रवेश मिळविला. दररोज एक कोटी रुपयांपर्यंतच्या उलाढालीने सोमवारी दोन कोटी रुपयांर्प्यत मजल मारल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला. रांगा लावून भाज्या खरेदी केल्याने अनेक किरकोळ पालेभाजी विक्रेत्यांनी चढ्या दरात शहरी भागात भाजीपाला विक्री केल्याचे पाहायला मिळाले. तसेच खाद्यपदार्थही छापील किंमतीपेक्षा जास्त दराने नागरिकांना खरेदी करावे लागले. टाळेबंदी लागण्यापुर्वीच सामान्यांना चढ्या दराने वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत.