संदीप नाईक यांनी केले प्लाझमा दान

नवी मुंबई ः ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी कोपरखैरणेतील रूग्णालयात प्लाझमा दान करून इतरांनाही प्लाझमा दान करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. रूग्णसंख्येचा जणू उद्रेकच झाला आहे. ऑक्सिजन व व्हेंटीलेटरवरील रूग्णांचा आकडाही वाढतो आहे. कोरोनाची चैन तोडण्यासाठी सरकारने 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउनही जाहिर केला आहे. गंभीर स्वरूपाच्या कोविड रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मानवी रक्तातील प्लाझमा वरदान ठरतो. ऑक्सिजनवर असणारे तसेच मध्यम आणि तीव्र लक्षणे असणार्‍या कोरोना रूग्णांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरते आहे. त्यामुळेच राज्यात प्लाझ्माची मागणी वाढली आहे. राज्यात सध्या रक्ताचा आणि प्लाझमाचा तुटवडा जाणवतो आहे. कोरोना मदतकार्यात व्यस्त असताना संदीप नाईक यांनाही कोरोनाने घेरले. काही दिवसांपूर्वी ते कोविड 19 मधून पूर्णपणे बरे झाले. कोरोनावर यशस्वीपणे मात करून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार होत असतात. या व्यक्तींचा प्लाझमा गंभीर कोरोना रूग्णाला दिल्यास तो बरा होण्याच्या शक्यता वाढतात. माझ्या प्लाझमा दानातून जर एखाद्या कोरोना बाधित बांधवाचे प्राण वाचत असतील तर त्यासारखे मोठे समाधान नाही. त्यासाठीच मी आज प्लाझमा दान करण्यासाठी आलो आहे, अशा भावना संदीप नाईक यांनी प्लाझमा दानप्रसंगी व्यक्त केल्या. त्याचबरोबर जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत आणि जे प्लाझमा दान करण्यासाठी पात्र असतील त्यांनी खासकरून तरूणांनी नक्कीच यासाठी पुढे यावे आणि प्लाझमा दान करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहन देखील संदीप नाईक यांनी नागरिकांना केले आहे. प्लाझमा दान अत्यंत सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः प्लाझमा दान करून संदीप नाईक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व तरूणांना प्लाझमा दान करण्याचा कृतिशील व अनुकरणीय संदेश दिला आहे.