गरजू कुटुंबियांना रोज मोफत जेवण

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा उपक्रम

पनवेल : बर्‍याच ठिकाणी अनेक कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. काहींच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व बाधित आहेत. अशा परिस्थितीत त्यांना स्वयंपाक करणे शक्य नाही. अशा गरजू कुटुंबीयांसाठी पनवेलमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रोज मोफत जेवण पुरवले जात असल्याने सामाजिक बांधिलकी जपली असल्याची माहिती चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी दिली.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. आठ ते दहा दिवसात पनवेल महानगरपालिका परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एखाद्या कुटुंबाच्या सर्व परिवाराला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्या कुटुंबाचे हाल होत आहेत. तसेच घरातील महिला जर बाधित झाली तर दैनंदिन जेवणाचा प्रश्न भेडसावतो. काही पुरुष मंडळी स्वतः जेवण बनवतात. मात्र काही कुटुंबात पती-पत्नी दोन्ही बाधित होतात अशा वेळी शेजारील नागरिकही मदतीचा हात पुढे करू शकत नाहीत. किंबहुना त्यांची इच्छा असूनही त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे अशा कुटुंबियातील मुलांची चांगलीच हेळसांड होते. पनवेल शहरातील अनेक कुटुंब सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अशा विखुरलेल्या कुटुंबाना मदतीचा हात म्हणून रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात कोणत्याही संकटाला सामोरे जात मदतीचा हात पुढे करणारे जेे एम म्हात्रे चारीटेबल संस्थेच्या वतीने गरजूंना रोज मोफत जेवण देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह शहरातील अनेक कुटुंबांना या संस्थेचा आधार मिळाला आहे.

लॉकडाऊनमुळे मजुरांसह सामान्य कुटुंबातील नागरिकांचे हाल होत आहेत. एखादी व्यक्ती जर बाधित झाली तर त्या कुटुंबाचा एक सदस्य एका ठिकाणी तर दुसरा दुसर्‍या ठिकाणी असतो. त्यामुळे कुटुंबातील इतरांच्या जेवणाचे अवघड होते. त्यासाठी जेवणाची सोय केली आहे. अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. संकटांच्या काळात नागरिकांना सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी आमचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. - प्रितम म्हात्रे, अध्यक्ष, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था