लस नवी मुंबईत प्रमाणपत्र दिल्लीचे

सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांना धक्का

नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात राबवलेल्या कोव्हीड लसीकरणाच्या मोहिमेतील त्रुटी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. याचा प्रत्येय नागरिकांना येत असून सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनाही याचा अनुभव आला आहे. त्यांनी खारघर येथे कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असतानाही त्यांना प्रमाणपत्र मात्र दक्षिण दिल्लीतील बेनसुप्स रुग्णालयात लस घेतल्याचे मिळाले आहे. 

नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी आपल्या पत्नीसह 3 मार्च रोजी खारघर येथील युपीएचसी 5 येथून कोव्हिडशील्ड चा पहिला डोस घेतला होता. परंतु या दाम्पत्यांना लसीचे प्रमाणपत्र मात्र वेगवेगळ्या ठिकाणचे तसेच वेगवेगळ्या लसीचे देण्यात आले. संदीप ठाकूर यांना कोव्हॅक्सीन तर त्यांच्या पत्नीला कोव्हीडशील्डचे प्रमाणपत्र देण्यात आले. संदीप ठाकूर यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात टिकाकरणाचे स्थान म्हणून बेनसुप्स रुग्नालय दिल्लीचा पत्ता आहे. संदीप ठाकूर हे ज्यावेळी दुसरा डोस घेण्यासाठी खारघरला गेले त्यावेळी त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी उपस्थितांच्या नजरेस ही घटना आणून दिली असता सुरुवातीला तेथील व्यवस्थापनाने  याबाबीची दखल घेण्यास टाळाटाळ केली. पण जेव्हा त्यांनी 3 मार्चचे रेकॉर्ड तपासले तेव्हा त्यांना ठाकूर यांनी  कोव्हीशील्ड ही लस खारघरमधूनच घेतल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची चौकशी आम्ही करु असे सांगून त्यांनी ठाकूर यांना दुसरा डोस देऊन त्यांची बोळवण केली. अशा घटना जर सर्वसामान्य व्यक्तींसोबत घडल्या तर होणार्‍या परिणामांस कोण जबाबदार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.