पोलीसांनी जपली सामाजिक बांधिलकी

नवी मुंबई ः कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने संचारबंदीचे आदेश दिले आहेत. याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीसही 24 तास ऑन ड्युटी राहुन आपले कर्तव्य बजावत आहेत. आपले कर्तव्य बजावतानाच ते गरजुंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकीही पार पाडत आहेत. 

लॉकडाऊनचे अनुषंगाने गरजू मुलांना मदत व्हावी यासाठी शुक्रवारी स्माईल फाऊंडेशन व नेरूळ पोलीस ठाणेचे वतीने, नेरुळ पोलिस ठाणे हद्दीतील रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, सेक्टर 18A, नेरुळ  व  जीवनज्योती आशालय सेक्टर 16A, नेरुळ नवी मुंबई येथील अनाथ बालकांना (एकूण 54 बालकांना) जीवनावश्यक वस्तूंचे (अन्नधान्य, बिस्कीट, दूध पावडर, चॉकलेट्स) तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

संचार बंदीचे आदेश असल्याने हातावर पोट असणार्‍या नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्याचाच विचार करून खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या वतीने झोपडपट्टीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. लॉकडाऊनमुळे गरीब, गरजू नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे अन्नाची परवड होते. अनेकांना उपाशी राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. अशा खांदा कॉलनी, सेक्टर 12 येथील झोपडपट्टीतील नागरिकांना पोलिसातर्फे अन्नाचे वाटप करण्यात आले.