कोरोना उपायांसाठी सिडकोने पालिकेला 25 कोटी रूपये द्यावेत

आ. गणेश नाईक यांची मागणी; मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन

नवी मुंबई ः राज्यभर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना नवी मुंबईतही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शेतकर्‍यांच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून त्यावर श्रीमंत बनलेल्या सिडकोने इतर महापालिकांनाप्रमाणेच कोरोना उपाययोजनांसाठी नवी मुंबई पालिकेला किमान 25 कोटी रूपयांचा निधी तात्काळ सुपूर्द करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक संजय मुखर्जी यांना आ. नाईक यांनी 17 एप्रिल 2021 रोजी पत्र वाठवून कोरोना काळात इतर महापालिका हददीमध्ये ज्या प्रमाणे सिडकोने आतापर्यंत भरघोस आर्थिक मदत दिली आहे त्याच धर्तीवर नवी मुंबई पालिकेलाही सहकार्याचा हात द्यावा, असे म्हंटले आहे. सिडकोने आतापर्यंत मुंबई महापालिकेसाठी मुलुंड येथे त्याचप्रमाणे ठाणे आणि पनवेल महापालिकांसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड केंद्रे उभारण्यासाठी आर्थिक मदत देवू केली आहे. मात्र ज्या भागातून सिडको मोठी झाली त्या नवी मुंबईकडे सिडकोने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नवी मुंबईत सध्या दिवसाला 1200 ते 1500 सरासरी नविन रूग्णवाढ होते आहे. एकुण उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या शुक्रवार पर्यंत तब्बल 11,114 वर पोहोचली आहे. वाढत्या रूग्णसंख्येचा ताण शहरातील आरोग्य व्यवस्थेवर पडत असून आयसीयू, व्हेंटिलेटर्सचे बेड उपचारासाठी उपलब्ध होत नाहीत. रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बेडसाठी वणवण करावी लागते आहे. नवी मुंबई महापालिका पूर्ण क्षमतेने कोविड 19वर नियंत्रण आणण्यासाठी सुविधा निर्माण करते आहे. अशा परिस्थतीत सिडकोने देखील नवी मुंबईत उपचाराच्या अद्ययावत सुविधा तयार करण्यासाठी पालिकेला मदत करावी. नवी मुंबईतील कोरोना आपत्ती निवारणात सहकार्य म्हणून सिडकोने पालिकेला 25 कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी आ. नाईक यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक मुखर्जी यांच्याकडे केली आहे. त्यावरमुखर्जी काय निर्णय घेतात? याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

कोरोना बाधितांना वेळेत उपचार मिळण्यासाठी ठोस कार्यवाही करावी
नवी मुंबईतील कोरोना रूग्णांना वेेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपायोजना कराव्यात, अशी परखड सुचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 17 एप्रिल 2021 रोजी पत्र पाठवून नाईक यांनी  कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता सर्वांना वेळेत उपचार द्यावेत आणि कोरोनाचे संभाव्य मृत्यू टाळावेत, असे निक्षून सांगितले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रूग्णसंख्येचा आलेख वेगाने वाढत असताना  पूर्वी दिवसाला दोन ते तीन कोरोना मृत्यू होत असतं हा आकडा आता  9 पर्यंत पोहाचला आहे. मृत्यूदर वाढताना दिसतो आहे.  साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड इत्यादींची उणिव जाणवते आहे. केअर सेंटर कमी पडत आहेत. गंभीर रूग्णांसाठी जीवरक्षक ठरलेले रेमडेसेवीर इंजेक्षन मिळत नाही. सर्व प्रकारच्या बेडची संख्या, कोविड सेंटरची संख्या आणि रेमडेसेवीर सारख्या औषधांची उपलब्धता वाढविण्याची मागणी त्यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर वाढणारे कोरोना मृत्यू टाळण्यासाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्याची सुचनाही त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील एकही रूग्ण उपचाराअभावी मागे राहता कामा नये, सर्वांना वेळेत उपचार मिळायला हवेत, अशी  निर्वाणिची सुचना आ. नाईक यांनी केली आहे.

इतर महापालिकांना ज्याप्रमाणे सिडकोने कोविड सेंटर्स व इतर कोरोना उपायांसाठी सढळ हस्ते वित्तीय मदत केली आहे त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेला देखील करावी. अन्यथा सिडकोने नवी मुंबईवर केलेल्या या अन्यायाविरोधात लोकशाही ही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. - आ. गणेश नाईक