Breaking News
नवी मुंबई ः दररोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर नियमितपणे 3 ते 4 तास वेबसंवादाव्दारे सर्व खाजगी रूग्णालयांतील महानगरपालिकेचे नोडल अधिकारी तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व विभागांचे सहा.आयुक्त आणि आरोग्य विभागातील व इतर विभागांचे या कामाशी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करीत असून यामधून पुढील कार्यवाहीची दिशा ठरविली जात आहे. यामध्ये ट्रिटमेंट प्रोटोकॉल सोबतच डिस्चार्ज प्रोटकॉलचे पालन करण्यावर भर देण्याचे निर्देशित करण्यात येत असून त्याचा रूग्णालयनिहाय आढावा घेतला जात आहे. याशिवाय बेड्स उपलब्धता, रूग्णवाहिका, ऑक्सिजन, ऑषधसाठा, रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसींग ), कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी या महत्वाच्या बाबींचाही तपशील जाणून घेतला जात आहे तसेच त्यामध्ये सुधारणा सूचविल्या जात आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने अधिकाधिक आरोग्य सुविधा वाढीवर भर देत असतानाच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडेही बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचे सहकार्य सर्वात महत्वाचे असून नागरिकांनी ’ब्रेक द चेन’ आदेशानुसार जाहीर केलेल्या संचारबंदीतील प्रतिबंधांचे काटेकोर पालन करावे असे सूचित करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी शक्यतो घराबाहेर पडू नये आणि अत्यावश्यक बाबींसाठी काही वेळ घराबाहेर पडल्यास पूर्णवेळ मास्क परिधान करावा आणि कोणत्याही ठिकाणी आपल्यामुळे गर्दी होणार नाही याचे भान राखत सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे व नियमित हात स्वच्छ ठेवावेत असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai