राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू

दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणार

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील. 

राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यात निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्यांवर वर्दळही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता याबाबतचं अधिकृत पत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे. राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे. 

नवे नियम काय असणार?
किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.
दादर स्टेशनवरील भाजी मार्केट हलवणार
मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन आणि वारंवार सूचना देऊनही मुंबईच्या दादर परिसरातील भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करत असल्याने आता हे मार्केट स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत वारंवार सांगूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये भाजी मार्केटमध्ये सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दी होते. गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. तशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून आता पालिकेकडून दादर मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.