नवी मुंबईचा ऑक्सिजन पळविणार्‍या गुंडांना रोखा

आमदार गणेश नाईक यांची पालिका आयुक्तांना सूचना

नवी मुंबई ः नवी मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून उपाययोजनांच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नसल्याने ही वेळ आली आहे. जे अधिकारी आणि कर्मचारी काम करीत नसतील किंवा त्यांच्याकडून काम होत नसेल अशांना घरी बसवा, असे परखड मत आमदार गणेश नाईक यांनी मांडले आहे. तसेच नवी मुंबई बनणारा ऑक्सिजन हा इतर महापालिकेतील पुढारी ऑक्सिजन पुरवठादारांना बाहेरील काही गुंड दमदाटी करीत त्यांच्या शहरांत घेवून जात आहेत. हे चालू देणार नाही. त्यामुळे आपले अधिकारी नेमून प्राधान्याने आपल्या शहरातील ऑक्सिजन नवी मुंबईकरांसाठीच वापरला जावा असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले.  

नाईक यांनी मंगळवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक नियमित साप्ताहिक बैठक घेतली. यावेळी रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर बेड मिळत नाहीत. रेमडेसेवीर इंजेक्शन भेटत नाही. रुग्ण बेडसाठी ताटकळत असतात, याकडे नाईक यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर व साध्या खाटांची संख्या आणखी वाढवून रेमडेसेवीर व इतर औषधे वेळेवर मिळतील हे सुनिश्चित करण्याची सुचना त्यांनी केली. महापालिका रुग्णालयांप्रमाणेच खाजगी रुणालयांमधूनही या गोष्टी उपलब्ध करुन देण्यास मदत करावी कारण या हॉस्पिटलमधूनही आपलेच नवी मुंबईकर उपचार घेत आहेत. संदीप नाईक यांनी डी वाय पाटील रुग्णालयांमधून पेशंटला बाहेरुन इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते अशी माहिती देवून गरज असताना पालिकेचे नोडल अधिकारी नागरिकांचे फोनही उचलत नाहीत, असे ते म्हणाले. यावर संबधीत अधिकार्‍यांना योग्य सुचना देण्याचे आयुक्तांनी मान्य केले. पालिकेच्या कोविड सेंटरर्समधून साफसफाई चांगली नसते. अन्नपदार्थांचा दर्जा चांगला नसतो. या कमतरता दूर करण्यास सांगितले. एखादा पेशंट पॉझिटिव्ह बनला तर त्याच्या चाचणीचा अहवाल तीन ते चार दिवसांत येत नाही परिणामी रिपोर्ट येईपर्यंत त्याच्यावर उपचार होत नाहीत. त्याची तब्येत ढासळते. आणि जीव जाण्याचा धोका निर्माण होतो. तसेच ऑक्सिजन पुरवठादारांना बाहेरील काही गुंड दमदाटी करीत नवी मुंबईतील ऑक्सिजन त्यांच्या शहरांत घेवून जात आहेत. हे चालू देणार नाही. त्यामुळे आपले अधिकारी नेमून प्राधान्याने आपल्या शहरातील ऑक्सिजन नवी मुंबईकरांसाठीच वापरला जावा. असे आमदार गणेश नाईक यांनी निक्षून सांगितले. त्यावर आयुक्तानी कार्यवाही करण्याचे मान्य केले. सर्व ऑक्सिजन पुरवठादारांची बैठक घेवून पालिकेचे समन्वयक अधिकारी नेमावा व पोलीसांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

पालिकेने स्वखर्चान होम क्वारंटाईन रुग्णांसाठी मेडिकल किट दयावे 
होम क्वारंटाईन रुग्णांसाठी पालिकेने स्वखर्चाने मेडिकल किट रुग्णांच्या घरी पोहचविण्याचा सल्ला संदीप नाईक यांनी दिला. हा सल्ला आयुक्तांनी मान्य केला. या मेडिकल किटमध्ये रुग्णांनी क्वारंटाईन कालावधीत घेण्याची काळजी, आहार, औषधे घेण्याविषयी मार्गदर्शन इत्यादींची माहिती मिळणार आहे. 
हेल्पलाईन तीन भाषांमध्ये असावी
पालिकेने कोरोना रुग्णांसाठी सुरु केलेली हेल्पलाईन सर्वांना समजेल अशी किमान तीन मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये असावी अशी सुचना संदीप नाईक यांनी केली ती आयुक्तांनी मान्य केली.