अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल

नवी मुंबई ः कोरोनामुळे राज्यत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून सर्वांना संचारबंदी करण्यात आली आहे. एकीकडे जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा म्हणून एपीएमसीची पाचही घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यायची दिली आहे. मात्र माथाडी, मापाडी या घटकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास नाकारण्यात आला आहे. हा परस्परविरोधी निर्णय तात्काळ रद्द करून कडक निर्बंधांच्या या काळात माथाडी व मापाडी कामगारांना रेल्वे, बस प्रवासात सूट देण्यात यावी अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर निर्णय न घेतल्यास शनिवार व रविवारी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

तुर्भे येथील भाजी, फळ, अन्नधान्य, कांदा बटाटा, मसाला या पाच घाऊक बाजारपेठेत काम करणारे माथाडी व मापाडी कामगारांना शुक्रवारी सानपाडा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी प्रवास करण्यास मज्जाव केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माथा़डी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सानपाडा रेल्वे स्थानकात धाव घेतली. राज्य सरकारने संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्राला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या या पाच घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र या घाऊक बाजारपेठेत सर्व प्रकारची कामे करणारे माथाडी, मापाडी, वारणार, साफसफाई कामगार, वाहतूकदार यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला नाही. या घटकाशिवाय बाजारपेठेतील पानदेखील हलत नसताना बाजारपेठा सुरू ठेवा पण यासाठी काम करणार्‍या कामगारांचा अत्यावश्यक सेवेत प्रवेश न करता त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेत प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे माथाडी कामगार संतप्त झाले असून या निर्णयाच्या विरोधात माथाडी भवनमध्ये एक तातडीची बैठक घेऊन शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हा निर्णयात बदल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे. गेल्या वर्षीदेखील या घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला नव्हता.