प्रभागानुसार काळजी केंद्र उभारण्याची मागणी

नवी मुंबई : शहरात मुबलक काळजी केंद्रे उभारण्यात आल्यानंतरही करोनाबाधित रुग्ण घरी राहणे पसंत करीत आहेत. सध्या असणारी काळजी केंद्रे ठराविक ठिकाणीच असल्याने दळणवळणासाठी गैरसौयची ठरत आहेत. त्यामुळे मोठी काळजी केंद्रे उभारण्यापेक्षा छोटी मात्र तीन चार प्रभागातील बाधितांना सोयीचे होईल अशी काळजी व आरोग्य केंद्र उभारण्यात यावीत अशी मागणी नागरिक करत आहेत. 

नवी मुंबईत सध्या दहा हजारापेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत. यातील सहा हजार रुग्ण काळजी केंद्रात उपचार घेत आहेत. पालिकेने शहरात 12 ठिकाणी काळजी केंद्रे उभारली असून त्या ठिकाणी सर्व सेवासुविधा दिलेल्या आहेत. कोरोना साथीत प्राथमिक उपचार हे काळजी केंद्रातच योग्य प्रकारे करण्याची आवश्यकता असल्याने ही केंद्रे उभारण्यावर पालिकेने भर दिला आहे, मात्र ही सर्व केंद्रे वाहतूक आणि भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या ठिकाणी आहेत. तुर्भे येथील निर्यात भवन हे पनवेल येथील इंडिया बुल्समधील काळजी केंद्राची आठवण करून देणारे आहे, तर सानपाडा येथील एमजीएमची नवीन इमारतही अडगळीत असल्यासारखे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या दोन अडीच हजार रुग्णशय्या रिकाम्या आहेत. त्याचवेळी 86 हजारापेक्षा जास्त नागरिक करोनाबाधित आहेत. या करोनाबाधित रुग्णांना घराजवळ काळजी केंद्र उपलब्ध करून दिल्यास काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. याउलट घरापासून दूर घेऊन गेल्यास रुग्णांच्या मनात भीती पसरत आहे. वाशी, नेरुळ या ठिकाणी काळजी केंद्र असताना सानपाडा येथील सेक्टर पाचमध्ये गायत्री परिवाराने आपल्या संस्थेची इमारत काळजी केंद्रासाठी देऊ केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या केंद्रात प्राथमिक उपचार घेणे शक्य होणार आहे. स्थानिक माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या प्रयत्नाने ही सेवासुविधा सानपाडावासीयांना उपलब्ध होणार आहे. दिवा ते दिवाळे हा नवी मुंबईचा परिसर उत्तर- दक्षिण या सरळ रेषेत पसरलेला आहे. त्यामुळे ऐरोलीतील रुग्ण वाशीत उपचारासाठी येताना भयभीत होत असल्याचे आढळून आले आहे. काळजी केंद्रात वेळेवर जेवण, गोळ्या व इतर सुविधा देण्यात येत असल्याने रुग्ण याच ठिकाणी चांगला होण्याची शक्यता वाढत आहे. आयसीएमआरने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच या रुग्णांवर उपचार केले जात असल्याने ते सिडकोच्या नोडमध्ये करणे शक्य आहे. जम्बो काळजी केंद्र उभारण्यापेक्षा छोट्या केंद्रावर पालिकेने भर द्यावा अशी मागणी वाढू लागली आहे.