पनवेलमधील अनेक इमारती कोरोनामुक्त

पनवेल ः महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांचा प्रतिसाद तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमधील रहिवाशांनी शासन व मनपाच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्याने खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल नोडमधील प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये दुसर्‍या लाटेत एकूण 504 प्रतिबंधित क्षेत्रापैकी 389 इमारती कोरोनामुक्त क्षेत्र करण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेने संक्रमित रुग्णांच्या वास्तव्याची ठिकाणे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधित फ्लॅट, सदनिका, विंग, सूक्ष्म कोरोनाबाधित क्षेत्र, मोठे कोरोनाबाधित क्षेत्र अशा प्रकारे विभागणी करून पालिका इमारती सील करीत आहे. सध्याच्या घडीला सूक्ष्म कोरोनाबाधित क्षेत्रातील इमारती मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त झाल्या असून मोठ्या कोरोनाबाधित क्षेत्रामधील रुग्ण कमी झाल्याने या क्षेत्राचे रूपांतर सूक्ष्म कोरोनाबाधित क्षेत्रात झाले आहे. काही दिवसांपासून ‘ब्रेक द चेन‘ अंतर्गत महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. महापालिका हद्दीत लॉकडाऊनचेही काटेकोर पालन केले जात आहे. त्याचा चांगला परिणाम आता दिसू लागला आहे. पनवेल महानगरपालिकेने कोरोनाबाधित सोसायटींना कंटेन्मेंट झोनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देऊन सोसायटी स्तरावरदेखील कंटेन्मेंट झोन नियमांचे काटेकोरपणे पालन कसे होईल याकडे सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी विशेष लक्ष दिल्यानेच विविध नोडमध्ये आज कोरोनामुक्त क्षेत्राचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.