45 मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू उपलब्ध

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल

नवी मुंबई ः महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी विशाखापट्टणम येथे गेलेली ऑक्सिजन एक्सप्रेस सोमवारी कळंबोली स्थानकात दाखल झाली. तीन टँकरमधून सुमारे 45 मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू कळंबोली स्थानकात पोहोचल्यावर रेल्वे आणि परिवहन विभागाच्या मदतीने ते रेल्वेच्या मालधक्क्यावरून रस्त्यावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले.

राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला. विशाखापट्टणम येथून वैद्यकिय लिक्विड ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेल मधील कळंबोली येथून 10 टँकरची ऑक्सिजन एक्सप्रेस 19 एप्रिल रोजी रवाना झाली होती. सोमवारी ही ऑक्सिजन एक्सप्रेस पुन्हा कळंबोलीत परतल्याने कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जामनगर येथून निघालेल्या या ऑक्सिजन एक्सप्रेस मधील 10 टँकरपैकी 3 टँकर नागपुर, 4 टँकर नाशिक तर 3 टँकर कळंबोली येथे उतरविण्यात आले. कळंबोली येथे आलेले टँकर्स रिलायन्स जामनगर येथून आलेले आहेत. यातील प्रत्येक टँकरमध्ये 15 टन प्राणवायू असून एक टँकर पुणे येथे आणि उर्वरित दोन अन्न-औषध प्रशासनाच्या निर्देशाने मुंबईतील प्राणवायूची गरज असलेल्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी परिवहन विभागाने प्राणवायू कॉरिडॉर बनविले होते. विनाअडथळ्याचा प्रवास असण्यासाठी स्थानिक वाहतूक विभाग आणि परिवहन विभाग यांच्यामध्ये समन्वय साधण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

प्राणवायू एक्स्प्रेस कॉरिडॉर

16 तासांत प्राणवायू एक्स्प्रेसने 860 किलोमीटरचे रेल्वे रुळाचे अंतर पार केले. दुपारी तीन टँकरला कळंबोली स्थानकात उतरण्यासाठी दुपारी अडीच वाजले. मात्र त्यानंतर परिवहन विभाग, अन्न-औषधे प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वयाने दोन टँकर मुंबईत विविध ठिकाणी जाण्यासाठी महामार्गाला प्राणवायू एक्स्प्रेस कॉरिडॉर हे विशेष रस्त्याचे नियोजन केले होते. याची सर्वाधिक जबाबदारी वाहतूक पोलिसांवर होती. रस्त्यावर कुठेही अडथळा होऊ  नये तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वेळेत सुरक्षितरीत्या पार करता यावे असेच नियोजन वाहतूक विभागाने केले होते.