बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना मिळणार बंदिस्थ गाळे

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केलेल्या बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना व्यवसायाकरिता लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडून बंदिस्त गाळे मिळणार आहेत. या संदर्भात पालिका शहर अभियंता संजय देसाई, बेलापूर विभाग अधिकारी व सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल तसेच कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांजसह बैठक संपन्न झाली. यावेळी सदर मार्केटचा तयार करण्यात आलेला आराखडा सादर करण्यात आला असून लवकरच आवश्यक कार्यवाही पूर्ण करून सदर बांधकामास सुरुवात करणार असल्याचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सूचित केले. 

 गेल्या अनेक वर्षांपासून बेलापूर ग्रामस्थ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता लहान सहान व्यवसाय करीत आहेत. व्यवसाय करताना ग्रामस्थांनी ग्रामपंचायती पासून कर आकार भरला असून आजपर्यंत नवी मुंबई महापालिकेचा कर भरणाही केला आहे. असे असतानाही न.मुं.म.पा. कडून ग्रामस्थांच्या दुकानांवर तोडक कारवाई केली गेली. अशा अधिकृत ग्रामस्थ दुकानदारांचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याने अधिकृत गाळेधारकांना बंदिस्थ गाळे मिळावे व त्यांना न्याय मिळावा अशी मागणी करून महापालिका आयुक्त यांजकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आयुक्तांनीही सकारात्मक निर्णय घेऊन गाळेधारकांना 9ु6 आकाराचे बंदिस्थ गाळे वितरीत करण्याचे आश्‍वासन दिले होते. आज शहर अभियंता व संबंधित अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली असून लवकरच मार्केट उभारून पात्र गाळेधारक ग्रामस्थांना गाळे वितरीत करण्यात येणार आहेत. सदर मार्केट उभारणीसाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीचीही तरतूद करण्यात आलेली आहे. बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत होणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.