पनवेलमध्ये लसीकरण केंद्रे वाढवा

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक रुग्णालयांना कोविड लसीकरणासाठी परवानगी देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.  

24 एप्रिल 2021 रोजी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी पत्राद्वारे कोविड लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी सूचना केली होती. परंतु त्यानंतर लसीकरणाबाबत योग्य सूचना वरिष्ठ पातळीवरून न मिळाल्यामुळे महापालिका आणि प्रशासनाकडून त्या संदर्भात काही कार्यवाही झाली नाही. या विषयावर 28 एप्रिल 2021 रोजी प्रितम म्हात्रे यानी भेट घेतली असता याबाबतीत आयुक्त योग्य ती ठोस पावले उचलत असल्याचे चर्चेमधून निष्पन्न झाले. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील जी रुग्णालये आहेत आणि त्यांना लसीकरण केंद्र सुरू करण्यास शासनाच्या निर्देशानुसार कोणतीही अडचण नाही तर त्यांना प्राथमिकता देऊन आयुक्तांनी त्वरित परवानगी द्यावी. जेणेकरून सध्या फक्त काही ठराविक ठिकाणीच कोविड लसीकरण केंद्रे आहेत त्यांची संख्या वाढून नागरिकांना लस मिळण्यास गर्दी न करता सोपे जाईल अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून नंतर लस दिली जाते. ज्याप्रमाणे इलेक्शनच्या वेळी डोअर टू डोअर जाऊन मतदारांची माहिती गोळा केली जाते, त्याप्रमाणे काही यंत्रणा राबवून रजिस्ट्रेशन केलेल्या व्यक्तींना जर का त्यांच्या सोसायटीच्या आवारात जाऊन लसीकरण करता येत असेल अशा प्रकारे काही नियोजन केले तर नागरिकांना घराच्या बाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. या गोष्टीसाठी जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्था आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातर्फे जे काही सहकार्य लागेल ते करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच काही प्रार्थनास्थळे आणि सेवाभावी संस्था हे गेल्या कित्येक वर्षापासून विविध प्रकारच्या आरोग्य सेवा देत आहेत. त्यासुद्धा या कोविड लसीकरण मोहिमेसाठी कोणतेही मानधन न घेता मोफतमध्ये सहकार्य करण्यास तयार आहेत. अशा लोकांना सुद्धा प्राधान्य देऊन त्यांची मदत घेऊन नागरिकांपर्यंत लस देण्यासाठी त्यांना सहकार्य करावे असे निवेदनात प्रितम म्हात्रे यांनी म्हटले आहे.