तुर्भे येथील कॉलसेंटरवर कारवाई

नवी मुंबई ः कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन आदेशानुसार संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असून सदर आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती, संस्था यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.नियमाचे उल्लंघन करणार्‍या तुर्भे येथील कॉलसेंटरवर पालिकेने कारवाई केली आहे. 

तुर्भे विभागातील अरिहंत ऑरा आयटी पार्क याठिकाणी असलेल्या ऑफिसबिंग या कॉलसेंटरमध्ये 183 कर्मचारी आढळून आल्याने या आस्थापनेवर तुर्भे विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर आणि दक्षता पथकाने पोलीसांसह धडक कारवाई करीत रुपये 1 लक्ष 36 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सींग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 183 व्यक्तींकडून प्रति व्यक्ती रु.200 प्रमाणे रुपये 36 हजार 600 तसेच ऑफिसबिंग या कॉलसेंटर आस्थापनेकडून 2 स्वतंत्र कार्यालयांकरिता प्रत्येकी रु. 50 हजार प्रमाणे रुपये 1 लक्ष दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. ब्रेक द चेन आदेशाचे उल्लंघन हे कोव्हीडच्या प्रसारासाठी पूरक ठरत असल्याने नागरिकांनी व आस्थापनांनी कोरोनाचा प्रसार रोखणे हे आपले कर्तव्य आहे याचे भान ठेवून कोव्हीड सुरक्षा नियमांचे संपूर्णत: पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.