11 हजार कामगारांना मिळणार कोविड भत्ता

मनसे युनियनच्या प्रयत्नामुळे एकूण 20 कोटी रुपये रक्कम अदा केली जाणार

नवी मुंबई ः केंद्र शासनामार्फत कोरोना कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. या काळातही नवी मुंबई महानगरपालिकेतील नियमित सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवेतील कायम अधिकारी / कर्मचारी तसेच कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी जोखीम पत्करून कामावर हजर राहून त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडत होते. त्यांना कोविड भत्ता मिळावा म्हणून मनसे युनियनने  पाठपुरावा केले होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून 300 रुपये प्रती दिन याप्रमाणे विशेष भत्ता मंजूर करण्यात आला आहे.

टाळेबंदीत नवी मनपातील परिवहन सेवा मर्यादित स्वरुपात सुरु असल्याने अत्यावश्यक सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यास अडचणी येत होत्या. तसेच सदरच्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दैनंदिन सेवा तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व भोजनालय बंद करण्यात आली होती. सबब सदरहू कर्मचारी यांना भोजनाची व्यवस्था उपलब्ध होत नव्हती. तथापि, नवी मुंबई महानगरपालिकेतील नियमित सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवेतील कायम अधिकारी / कर्मचारी तसेच कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी जोखीम पत्करून कामावर हजर राहून त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडत होते. नवी मुंबई मनपातील सर्व विभागातील सुमारे 7200 कंत्राटी कामगार, 2515 कायम कामगार 544 ठोक मानधनावरील कामगार व आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोरोना काळामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा भारती 741 असे एकूण 11 हजार कामगारांना 300 रुपये प्रती दिन कोरोना भत्ता मिळावा अशी मागणी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांना 23 मार्च 2020 ते 31 मे 2020  पर्यंत त्यांच्या उपस्थीतीनूसार 300 रुपये प्रती दिन याप्रमाणे विशेष भत्ता मंजूर करण्यात आला आहे. त्याची अंदाजित रक्कम 20 कोटी रुपये होते. कोविड भत्याचा पाठपुरावा युनियन अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, कोषध्यक्ष भूषण बारवे, उपाध्यक्ष रुपेश कदम व कामगार पदाधिकारी यांनी केला आहे.