रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगणार्‍या 3 रूग्णालयांवर गुन्हा दाखल करण्याची नोटीस

नवी मुंबई ः गंभीर लक्षणे असणार्‍या कोव्हीड रूग्णांसाठी लाभदायक असणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर हा महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्याची दक्षता घेण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रूग्णालयांना आदेशित केले आहे. तरीही रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगणार्‍या 3 रूग्णालयांवर पालिकेने गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले आहे.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करून घेणे ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असल्याने कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन मागणीची औषध चिठ्ठी रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ नये असे विशेष आदेशाद्वारे जाहीर केले होते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर रूग्णालयांवर कारवाई करण्यात येईल असेही सूचित करण्यात आले होते. रूग्णाच्या नातेवाईंकांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितल्याने त्यांच्या नातेवाईकांच्या चिंतेत भर पडते तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन मागणीची औषध चिठ्ठी दिल्याने सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सची कमी उपलब्धता पाहता रेमडिसिविरचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे स्पष्ट आदेश आयुक्तांमार्फत काढण्यात आले आहेत. मात्र तरीही रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगणार्‍या सनशाईन रूग्णालय सेक्टर 16 नेरूळ, सिध्दीका नर्सिंग होम सेक्टर 15 कोपरखैरणे व ओम गगनगिरी हॉस्पिटल सेक्टर 18 कोपरखैरणे या 3 रूग्णालयांना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुन्हा दाखल करणेबाबत नोटीस बजावलेली असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देशित केलेले आहे. सदर अहवालातील खुलासा असमाधानकारक असल्यास त्या रूग्णालयांवर भारतीय दंड संहिता तसेच साथरोग नियंत्रण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सूचित करण्यात आलेले आहे.

कोरोना बाधित रूग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना या काळात मानसिक दिलासा देणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन शासन पातळीवर विविध लोकहिताय निर्णय घेतले जात आहेत. त्यापैकीच एक रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेचा निर्णय असून त्याचे काटेकोर पालन करणे सर्वच रूग्णालयांना अनिवार्य असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या अनुषंगाने सूचित केले आहे.