अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीवर डॉ. जवादे यांची नियुक्ती

नवी मुंबई : राज्य सरकारच्या मानवी अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची नुकतीच फेररचना झाली असून या समितीवर सदस्य म्हणून प्रत्यारोपण तज्ञ्ज व आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या ‘दोस्त’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक नवी मुंबईतील डॉ. कैलाश जवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

डॉ. कैलाश जवादे हे सध्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रूग्णालयात शल्यचिकित्सा विभागात हिपॅटोबिलीयरी सर्जरी आणि प्रत्यारोपण शल्यचिकित्सा पथक प्रमुख(युनिट हेड) म्हणून कार्यरत आहे. वैद्यकीय क्षेत्रात दोन दशके कामाचा त्यांना अनुभव असून प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. 30 एप्रिल 2021 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची फेररचना करण्यात आली आहे. या समितीत राज्यभरातील प्रत्यारोपणाशी निगडीत 14 तज्ज्ञ सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच संचालक, आरोग्य सेवा यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जवादे यांनी एम.बी.बी.एस., एम.एस. यानंतर अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण हे कोरिया व तैवान या देशातून घेतले आहे. त्यांनी आजवर दिल्लीतील अपोलो रूग्णालयातील, चेन्नईतील चेट्टीनाड रूग्णालय तसेच मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयात काम केले आहे. आपल्या देशातील रूग्णांची अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे. त्यामुळेच आपल्या देशात अवयदानाबद्दल जाणीव जागृती करून त्याला रक्तदानासारख्या लोक-चळवळीचे रूप देणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन डॉ. जवादे हे ‘दोस्त’ या संघटनेच्या माध्यमातून गेली 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. विविध ठिकाणी जाऊन त्यांनी जाणीवजागृतीपर कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या संवादानंतर प्रेरित होऊन अनेकांनी अवयवदान दान संकल्प पत्र भरूनही दिले आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम व्हावे हे त्यांचे ध्येय असून विविध देशांमधील अशा कामांचा त्यांनी सखोल अभ्यासही केला आहे. या क्षेत्रात विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉ. डी.वाय. पाटील रूग्णालयात त्यांनी शल्यचिकित्सा क्षेत्रातील हिपॅटोबिलीअरी फेलोशिप सुरू केली आहे. या फेलोशिप अंतर्गत तरूण शल्यचिकित्सकांना (सर्जन) भारतासोबतच तैवानमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठा अंतर्गत कार्यरत अलाईड हेल्थ सायन्सेस या विभागात ते क्लिनिकल हेड म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत.