ऍकेडमीच्या निष्काळजीपणामुळे 20 विद्यार्थ्यांना कोरोना

ऍकेडमीच्या व्यवस्थापकावर गुन्हा

नवी मुंबई : पनवेल मधील बी.पी.मरीन ऍकेडॅमीने कोवीडच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता आपले वसतीगृह सुरु ठेवून त्याठिकाणी 200 विद्यार्थ्यांना ठेवल्याने वसतीगृहातील 20 विद्यार्थ्यांना कोवीडची लागण झाल्याचे उघडकिस आले आहे. बी.पी.मरीन ऍकेडमी व्यवस्थापनाच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे 20 विद्यार्थ्यांना कोवीडची लागण झाल्याचे आढळुन आल्याने पनवेल शहर पोलिसांनी बी.पी.मरीन ऍकेडमीच्या व्यवस्थापकासह इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

संचारबंदी काळात सर्व शाळा, कॉलेज व वसतीगृहे बंद ठेवण्याबाबत देखील सुचना देण्यात आल्या आहेत. असे असताना देखील पनवेल मधील बंदर रोड येथील बी.पी.मरीन ऍकेडॅमीने आपले वसतीगृह सुरु ठेवून त्यात 200 विद्यार्थ्यांना ठेवले होते. विशेष म्हणजे सदर वसतीगृहात विद्यार्थ्यांसाठी विलगीकरणाची तसेच स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था न करता 60 ते 70 विद्यार्थ्यांच्या समुहाला एकत्र ठेवले होते.  त्यातील एका विद्यार्थ्याला कोवीडची लागण झाली.  

त्यामुळे महापालिकेने सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर त्याठिकाणी राहाण्यास असलेल्या 200 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांना कोवीडची लागण झाल्याचे उघडकिस आले. त्यामुळे पनवेल महापालिका आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी कोवीडची लागण झालेल्या सदर 20 विद्यार्थ्यांना उपचारासाठी इंडिया बुल्स येथील विलगीकरणात दाखल केले.  

दरम्यान, बी.पी.मरीन ऍकेडमीने कोवीडच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेतल्यामुळे वसतीगृहातील 20 विद्यार्थ्यांना कोवीडची लागण झाल्याचे आढळुन आल्याने सदर घटनेला या ऍकेडमीच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ऍकेडमीचे प्रिन्सिपल कॅफ्टन दुबे यांच्यासह इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.