कोव्हिड काळातही महापालिका अभियांत्रिकीची अभिज्ञ कामगिरी

सहा महिन्यातच गाठला 1 हजार कोटींचा टप्पा

नवी मुंबई ः कोरोना संक्रमणाच्या काळातही पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आपली खर्चाची पताका अटकेपार फडकवली असून सन 2020-21 या आपत्कालीन वर्षात 1 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा पल्ला या विभागाने प्रथमच गाठला आहे. पालिकेचा या कालावधीचा एकुण खर्च 2300 कोटी रुपयांचा असून हाही एक विक्रम पालिकेच्या सर्व विभागांनी केला आहे. एप्रिल-मे हा लॉकडाऊन आणि पावसाळ्याचा कालावधी वगळून अभियांत्रिकी विभागाने हा पल्ला गाठल्याने त्याचे कौतुक होत आहे. मात्र या वाढणार्‍या अवाढव्य खर्चामुळे भविष्यात कामगारांच्या पगारासाठी तरी पैसा शिल्लक राहिल काय अशी शंका वर्तवली जात आहे. 

पालिकेच्या स्थापनेपासून अभियांत्रिकी विभागाचा खर्च हा इतर विभागातील खर्चापेक्षा जास्त असतो. अभियांत्रिकी विभागाने नवी मुंबई शहरात अनेक प्रकल्प कार्यान्वित केले असून त्यामध्ये शंभर कोटी रुपये खर्च करुन ठाणे-बेलापुर रस्त्याचे बांधकाम, मोरबे धरणाचे बांधकाम, त्याचबरोबर भोकरपाडा कळंबोली पाण्याच्या पाईपलाईन कामाचा समावेश आहे. या कामांबरोबरच शहरातील रस्ते, पदपथ-गटारे बांधणे, विद्युत कामे, पाणीपुरवठा व मल्लनिस्सारण यासारखी कामे या विभागामार्फत हाती घेतली जातात. गेल्या पाच वर्षात या विभागाने हजार कोटींच्या खर्चाचा टप्पा कधीच पार केला नव्हता. परंतु कोव्हिड संक्रमणाच्या काळात या विभागाने सूमारे हजार कोटी रुपये खर्च केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

देशात एप्रिल आणि मे महिना हा कडक लॉकडाऊनचा कालावधी होता. त्याचबरोबर जुन ते सप्टेंबर हा कालावधी पावसाळ्याचा असून या कालावधीत राज्यातील मजुरवर्ग त्यांच्या गावी असताना पालिकेच्या या विभागाने काम पुर्ण करण्यात दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे. शासनाने सर्व स्थानिक प्राधिकरणांना कोव्हिड संक्रमणामुळे अत्यावश्यक ती कामे हाती घेऊन त्यांच्या अर्थसंकल्पाच्या 30 टक्केच खर्च करण्याच्या सूचना केल्या होत्या. कोव्हिड संक्रमणामुळे या विभागाला विलगीकरण कक्ष बांधणे, कोव्हिड सेंटर उभारणे सारखी कामे तत्काळ स्वरुपात पुर्ण करावी लागल्याने या कामांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे. पालिकेकडे असलेला कर्मचारी वर्ग हा एका वर्षी 500 ते 600 कोटींची कामे सांभाळण्यास सक्षम असताना यातील बराचसा कर्मचारी वर्ग निवृत्त झाल्याने 1 हजार कोटी रुपयांची कामे आहे त्याच कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून पुर्ण करुन घेण्याचे कसब या विभागाने दाखवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. सन 2021-22 या कालावधीत पालिकेने सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 160 कोटींची निविदा, कोपरी उड्डाणपुलाची 250 कोटींची निविदा तसेच तुर्भे स्टोअर येथे 80 कोटी रुपयांचा उड्डाणपुल सारखी कोट्यावधींची कामे हाती घेतली आहेत. याशिवाय 360 कोटी रुपये खर्चुन घणसोली-ऐरोलीला जोडणारा उड्डाणपुलही यावर्षी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने कोट्यावधी रुपयांची कामे हाती घेतल्यास भविष्यात कामगारांना पगार देण्यासाठी निधी वाचेल का? अशी शंका ही उपस्थित केली जात आहे. सन 2014-15 साली पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने कर्मचारी व अधिकार्‍यांच्या पगारासाठी बँकेच्या ठेवी मोडल्या होत्या. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे व रामास्वामी यांनी अनावश्यक कामांना कात्री मारुन पालिकेच्या तिजोरीत अडीच हजार कोटींची भर घातली होती. हाच पैसा आता अनावश्यक कामांवर उधळला जात असल्याचा आरोप पालिका कर्मचार्‍यांकडून होत असून यास वेळीच आवर घातला नाही तर पुन्हा तिजोरीत खडखडाट होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्यावर्षी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने त्यावेळी ठेकेदारांची बिले या चालु वर्षात देण्यात आली. शिवाय कर्मचार्‍यांचा 52 कोटींची वेतनातील थकबाकी आणि कर्मचारी अधिकार्‍यांना 7 वा वेतन आयोग शिवाय कोव्हिड रुग्णालये, कोव्हिड सेंटर उभारणे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करावा लागल्याने सन 2020-21 मध्ये हजार कोटींचा खर्च झाला आहे. - संजय देसाई, शहर अभियंता

वर्ष अभियांत्रिकी विभागाचा खर्च     पालिकेचा एकुण खर्च
2015-16     748.58 कोटी             1586 कोटी
2016-17     313.58 कोटी             1145 कोटी
2017-18     412.08 कोटी             1524 कोटी
2018-19     710 कोटी    1850 कोटी
2019-20     687 कोटी     1833.74 कोटी
2020-21     1000 कोटी              2300 कोटी