मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य

पूर्वतयारीसाठी आयुक्तांचा बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद

नवी मुंबई ः कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई पालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसेच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईचे पदाधिकारी असणारे बालरोगतज्ज्ञ यांच्याशी वेबसंवाद साधत आगामी नियोजनाच्या दृष्टीने सर्वांगीण चर्चा केली. त्यांच्या संपन्न अनुभवाचा नियोजनामध्ये उपयोग व्हावा यादृष्टीने ही चर्चा अत्यंत महत्वाची होती.   

यावेळी झालेल्या संवादामध्ये विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. त्यामध्ये तिसर्‍या लाटेत लहान मुलांत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रसाराची शक्यता तितकीशी नाही, मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले. जरी लहान मुलांपैकी काही मुले कोरोना पॉझिटिव्ह आली तरी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मुले ही कोणतीही लक्षणे नसलेली अथवा अत्यंत अल्प प्रमाणात लक्षणे असणारी असतील. मात्र काही मर्यादीत मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशा संख्येने ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स व पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणेविषयी सूचना करण्यात आल्या. लहान मुलांसाठी गरजेच्या असलेल्या काही विशिष्ट चाचण्या उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विचारविनीमय करण्यात आला तसेच उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळापैकी काहीजणांना बालकांशी संबंधित वॉर्डमध्ये तसेच आयसीयू वॉर्डमध्ये काम करण्याविषयीचे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण आत्तापासूनच दिले जावे या बाबींवर चर्चा करण्यात आली.

लहान मुलांच्या वॉर्डमध्ये मुलाचे आई किंवा वडील केअर टेकर म्हणून थांबणे आवश्यक ठरते या बाबीचा विचार सुविधा निर्माण करताना व्हावा त्याचप्रमाणे ही केअरटेकर व्यक्ती कोव्हीड निगेटिव्ह असेल तर त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याकरिता मार्गदर्शक नियमावली तयार करणेबाबतही सूचना करण्यात आली. सध्या कोव्हीडमधून बरे झालेल्या काही मुलांमध्ये पोस्ट कोव्हीड आरोग्यविषयक तक्रारी आढळून येत असल्याची बाब चर्चेमध्ये विचारात घेण्यात आली व याविषयी आवश्यक दक्षता घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या. कोव्हीड बाधीत रूग्ण, मग ते प्रौढ असोत की लहान मुले, त्यांच्यामध्ये लक्षणे दिसल्यास त्यांची त्वरीत कोव्हीड टेस्ट करून घेणे अत्यावश्यक आहे. विशेषत: आपल्या लहान मुलांबाबत पालकांनी दक्षता घेऊन त्यांची टेस्टींग टाळू नये ही अत्यंत महत्वाची बाब यावेळी बालरोगतज्ज्ञांकडून विशेषत्वाने अधोरेखीत करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेने संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी जागरूकतेने अतिशय लवकर पूर्वनियोजन सुरू केल्याबद्दल प्रशंसा करीत याकामी नवी मुंबईतील सर्व बालरोगतज्ज्ञांचे संपूर्ण सहकार्य राहील अशी खात्री सर्व बालरोगतज्ज्ञांनी संघटनेच्या वतीने दिली.