कोरोना बाधीतांना योगासनांतून आत्मविश्‍वासाचे बळ

नवी मुंबई ः कोरोनावर मात करताना शारीरिक दृष्ट्या निरोगी राहणे महत्वाचे असल्याने योगासने लाभदायक ठरतात हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमधील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल कोरोना बाधीतांकडून दररोज नियमितपणे योगासने करून घेण्यात येत आहेत. दररोज सकाळी 11 ते 12 या एक तासात या योगक्रिया करून घेतल्या जात असून त्यामुळे रुग्णांमध्ये उत्साह व आत्मविश्‍वास निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात मनशक्ती हा एक महत्वाचा भाग असून योगासनांमधील प्राणायामुळे श्‍वासाचे संतुलन तसेच शरीरासह मनाचे संतुलन राखण्यास मदत होते. याचा उपयोग मनाची एकाग्रता वाढविण्यासही होतो. त्याचप्रमाणे विविध योग प्रकारामुळे शरीराच्या हालचाली होऊन शरीर सुदृढ राखण्यास मदत होते. त्यामुळे कोव्हीड सेंटरमधील या साध्यासोप्या योगसनांचा फायदा होताना दिसत आहे.

याठिकाणी रविवारसह दररोज 1 तासाच्या योग सत्रात पहिले अर्धा तास योगासने, त्यानंतर 15 मिनिटे प्राणायाम, त्यानंतर 15 मिनिटे ध्यानधारणा करून घेतली जाते. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे अनुभवसंपन्न योगा प्रशिक्षक श्री. प्रमोद कोकाणे हे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सिडको डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील कोरोना बाधीतांना  योग प्रशिक्षण देत असून कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सातत्याने 4 महिने त्यांनी तेथील कोरोना बाधीतांमध्ये योगाव्दारे आत्मविश्‍वास निर्माण केला आहे. याठिकाणी दररोज योगासने करण्याची लागलेली सवय कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतरही कायम राहिली असल्याचे अभिप्राय अनेक नागरिकांकडून आवर्जुन व्यक्त केले जात आहेत.