राज्यातील रिक्षा चालकांना आर्थिक मदत करा

नवी मुंबईच्या आप कार्यकर्त्यांची मागणी

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत ऑटोरिक्षा चालकांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र ही घोषणा करुन एक महिना झाला तरी काहीही हाती आलेले नाही. त्यामुळे केजरीवाल सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना आर्थिक मदत करा, अशी मागणी नवी मुंबईतील आप कार्यकर्त्यांनी केली आहे. 

नवी मुंबईतील आपच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या रिक्षा स्टँडवर भेट दिली. यावेळी त्यांनी रिक्षाचालकांच्या काही मागण्या समजून घेतल्या. राज्यात लॉकडाऊन असल्याने दिवसाला 300 रुपये पण निघत नाही. त्यात महाग गॅस, सॅनिटायझर, घर भाडे, कर्ज या सर्व गोष्टी असताना घर कसे चालवायचे. रस्त्यावर माणसे नाहीत, धंदा ठप्प झालाय, त्यात 1500 रुपयांची तुटपुंजी मदत तरी लवकर् दया, अशी मागणी तुर्भे रिक्षा युनियनचे पदाधिकारी मोहोम्मद रईस यांच्या कडून करण्यात आली. तसेच ही 1500 रुपयांची मदत मिळण्यास पाठपुरावा कुठे करायचा, या बद्दलची माहिती शासनाने जाहीर करावी. एखाद्या रिक्षाच्या लोनचा हप्ता साधारण सहा हजार रुपये असतो. त्यासाठी सरकारने कर्ज देण्यार्‍या कंपन्यांना सांगून दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी नेरुळ रिक्षा युनियनचे पदाधिकारी अनिल राठोड यांनी केली.

रिक्षा चालकांचे पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स माफ करावा
शासनाने लॉकडाऊन लावले आहे. दुकान बंद असल्याने रोजंदारीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. अनेक फेरीवाले, बांधकाम कामगार आणि रिक्षा-टॅक्सी चालक यांना शासनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचे उदाहरण समोर ठेवून बाधित घटकांसाठी तात्काळ मदत करावी. सर्व रिक्षा चालक बंधू सार्वजनिक दळणवळणचा अविभाज्य घटक असल्याने त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्याशिवाय लॉकडाऊन काळातील सर्व रिक्षा चालकांचे पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबईतील आपचे अध्यक्ष प्रमोद महाजन यांनी केली.