15 ते 20 टक्के भाजीपाला सडला

नवी मुंबई : तौत्के चक्रीवादळाचा फटका नवी मुंबईलाही सहन करावा लागला. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यामुळे आणि वादळी पावसामुळे नागरिकांनीही घरात राहणेच पसंत केले. भाजीपाला खरेदीसाठीही ग्राहक फिरकले नाहीत. यामुळे एपीएमसीतील भाजीपाला बाजारात 15 ते 20 टक्के भाजीपाला सडून गेला असून 40 ते 50 टक्के भाज्यांचे दर उतरले आहेत.

भाजीपाला बाजारात सोमवारी 538 तर मंगळवारी 345 वाहने आवक झाली. मात्र वादळ व पावसाच्या भीतीने उपनगरांतील ग्राहक घाऊक बाजारात फिरकलाच नाही. त्याचा व्यापारावर परिणाम झाला आहे. आवक मालापैकी 50 टक्केच मालाची विक्री झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरावरही परिणाम होत दरात 40 ते 50 टक्के घसरण झाली. बाजारात भाजीपाला शिल्लक राहिला असून तो फेकून देण्याची वेळ व्यापार्‍यांवर आली आहे. त्यातील 15 ते 20 टक्के पालेभाज्या खराब झाल्या असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. आधी प्रतिकिलो 8 ते 20 रुपयांवर असलेल्या भाज्या आता 5 ते 10 रुपयांवर घाऊक बाजारात मिळत आहेत. मात्र किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चढेच असल्याचे पाहायला मिळत आहेत.