फांद्या छाटणी 31 मे पर्यंत पूर्ण करा

आयुक्तांचे उद्यान विभागाला आदेश

नवी मुंबई ः सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची उद्यान विभागामार्फत सुरु असलेली छाटणी कामे नियोजिनबध्दरित्या काम करीत, आवश्यकता भासल्यास यंत्रसामुग्री व मनुष्यबळात वाढ करून 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश दिले. पावसाळापूर्व कामांतर्गत झाडांच्या फांद्या छाटणे या कामाचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने उद्यान विभागाची बैठक आयोजित करीत वरील आदेश दिले आहेत. 

तौक्ते चक्रीवादळामुळे 122 झाडे, झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या आहेत. विभाग कार्यालय स्तरावरील मदत पथके तसेच अभियांत्रिकी, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यान विभागाच्या माध्यमातून रहदारीला व वाहतुकीला अडथळा होऊ नये याकरिता झाडे, फांद्या हटविण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात आलेली आहे. पावसाळापुर्व कामांतर्गत झाडांच्या फांद्या छाटणी कामांचे विभागनिहाय नियोजन करून दररोज कोणत्या क्षेत्रात, किती काम झाले याचा तपशील नियमित सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी देण्यात येत असलेली विभाग कार्यालय पातळीवरील परवानगी आवश्यक पाहणी करून 24 तासात दिली जावी अशाही सूचना देण्यात आल्या. सद्यस्थितीत विभाग कार्यालय पातळीवर प्रलंबित असलेले सोसायट्यांतील वृक्ष फांद्या छाटणी परवानगी अर्ज 24 तासात निकाली काढण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. कोणत्याही परिस्थितीत वृक्षांच्या फांद्या छाटणीची परवानगी घेऊन संपूर्ण वृक्षच तोडला जाणार नाही याकडे काटेकोर लक्ष ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रहदारीला अडथळा करणार्‍या अथवा पथदिव्यांचा प्रकाश रोखणार्‍या झाडांच्या फांद्यांची छाटणी उद्यान विभागामार्फत केली जात असून संपूर्ण महापालिका क्षेत्रातील वृक्ष फांद्यांची छाटणी केली जात असल्याने त्यासाठी उपलब्ध 6 लॅडर व्हॅनमध्ये वाढ करावी तसेच फांद्यांची छाटणी करणारे मनुष्यबळही आवश्यकता असल्यास वाढवावे असे आयु्क्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे जलद काम व्हावे यादृष्टीने सकाळी 6 वाजता कामास सुरुवात करून संध्याकाळी 7 पर्यंत छाटणी करावी व रोजच्या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा आणि उर्वरित कामाचे नियोजन करावे तसेच दररोजच्या कामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

कामे सुरु असताना त्यावर पर्यवेक्षण हवे तरच कामावर नियंत्रण राहील असे सांगत अशा प्रकारची पर्यवेक्षण व्यवस्था ठेवावी आणि पावसाळापूर्व कामांमध्ये कालावधीच्या डेडलाईनचे महत्व लक्षात घ्यावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. याबाबतच्या कोणत्याही तक्रारीला त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे असे स्पष्ट करीत याकामी अडचण आल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले. या कामांची कोणत्याही विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून यामध्ये हलगर्जीपणा केलेला चालणार नाही असे स्पष्ट केले.