यंदा बाप्पांची परदेशवारी होणार

पेण : गतवर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहेच. मात्र तरीही गणरायाची परदेशवारी सुरू झाली आहे. जगप्रसिद्ध असणार्‍या पेणच्या गणेशमुर्ती यंदा मे महिन्याच्या अखेरीस परदेशात रवाना होणार आहेत. गेल्यावर्षी खंड पडलेली परदेशवारी यंदा सुरु होणार असल्याने मुर्तीकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

बाप्पांच्या परदेशवारीस अखेर सरकारची मान्यता मिळाल्याने व परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेणमधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा सूत्रांंनी माहिती देताना सांगितले. 2021 या वर्षातील गणेशोत्सव 10 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच ही ऑर्डर उशिरा का होईना परंतु जात असल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केले आहे. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाप्पांच्या परदेशवारीत खंड पडून 25 हजार गणेश मूर्तींची परदेश वारी न झाल्याने मूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही पुन्हा एकदा कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्याने मार्च महिन्याच्या अखेर मागणी केलेल्या गणेशमूर्तींची ऑर्डर मे महिन्याच्या अखेरीस जाण्यासाठी परवानगी मिळाल्याने पेणच्या मूर्तीकला विश्वात आनंद व्यक्त केला जात आहे. साधारणपणे पाऊणफूट उंचीपासून पाच फूट उंचीच्या मूर्ती थायलंड, अमेरिका, लंडन, मॉरिशस या देशांत सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी समुद्रमार्गे पोहोचतील. 40 फूट लांब कंटेनर 40 फूट लांब कंटेनरमध्ये 1000 लहान मूर्ती सामावतात. तर दोन व पाच फूट उंचीच्या 500 ते 600 बॉक्स कंटेनरमध्ये असून, अशा सात कंटेनरमधून मूर्ती जाणार आहेत. पेणच्या दीपक कला केंद्रातून शाडू मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 5000 गणेशमूर्ती अमेरिका, थायलंड या देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

नियमावली जाहीर करण्याची मागणी
मागील वर्षी शासनाने उशीरा नियमावली जाहीर करुन गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा घातली होती. त्यामुळे मूर्तिकारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. गेल्या वर्षीचा हा अनुभव असूनही शासनाने अद्याप नियमावली जाहीर केली नाही. त्यामुळे मूर्तिकार संभ्रमात आहेत. त्यांनी लहान गणेश मूर्ती बनविण्यास प्राधान्य दिले आहे. मागील वर्षीचे अनुभव पाहता शासनाने या वर्षी तरी लवकर नियमावली जाहीर करावी अशी अपेक्षा मूर्तिकार व्यक्त करीत आहेत.