पोलीस अधिकार्‍याने केले माऊंट एव्हरेस्ट शिखर सर

सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांची उत्तुंग कामगिरी

पनवेल ः नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकावला आहे. एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव हे महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. चार वर्षापुर्वी ते माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे याच एव्हरेस्टच्या टोकावरुन आईला श्रद्धांजली वाहण्याचा संकल्प त्यांनी केला होता. 

गुरव यांना प्रथमपासूनच गिर्यारोहणाची आवड होती. ती त्यांनी पोलीस दलात भरती झाल्यानंतरही जोपासली. त्यांनी एव्हरेस्ट बेसकॅम्पची मोहीम पूर्ण केली होती. नंतर गेली दोन वर्षे सराव करुन अखेर एव्हरेस्ट शिखर सर केले. उणे 19 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर चढाई करताना गुरव यांनी काठमांडू येथून सुरुवात केली. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा 65 किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण करत 17 मे रोजी कॅम्प-2 पर्यंत, 18 मे रोजी कॅम्प -3, 19 मे रोजी कॅम्प 54 आणि 20 मे रोजी कॅम्प-4 ते एव्हरेस्ट शिखर अशी चढाई सुरु केली. वातावरणाने साथ दिल्याने 23 मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले. यापूर्वी महाराष्ट्र पोेलीस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. संभाजी गुरव यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यायाम आणि शारिरिक क्षमता राखण्यावर त्यांनी कायम भर दिला. 2017 साली गुरव हे माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला असतानाच त्यांच्या आईचे बे्रन स्ट्रोकने निधन झाले. परंतु आजाराची लक्षणे अगोदर ओळखून आपण तिला योेग्य उपचार देऊ शकलो नाही याची खंत त्यांना वाटत होती. त्यामुळे तिला झालेल्या वेदनांपेक्षा आपल्याला अधिकाधिक  वेदना कशी होतील हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हा शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. मरणयातना सहन करत मिळवलेले यश हिच आईला श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गुरव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर नवी मुंबई पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनीदेखील गुरव यांचे विशेष कौतुक केले आहे.