रोशचे अँटीबॉडी कॉकटेल भारतामध्ये उपलब्ध

सिप्ला भारतभरात विपणन करणार 

मुंबई : रोश इंडिया व सिप्ला लिमिटेडने सोमवारी अँटीबॉडी कॉकटेलची पहिली बॅच भारतामध्ये उपलब्ध असल्याची घोषणा केली. तसेच दुसरी बॅच लवकरच जूनच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार आहे. यामुळे 200,000 रूग्णांना याचा लाभ होणार आहे. उपलब्ध होणार्‍या 100,000 पॅक्समधील प्रत्येक पॅक दोन रूग्णांसाठी उपचार देणार आहे. याच्या एका डोसची किंमत ही 59 हजार 750 रुपये इतकी आहे. या औषधाच्या पॅकमध्ये दोन डोस असून त्याची एकूण किंमत ही एक लाख 19 हजार 500 रुपये इतकी आहे. सिप्ला कंपनी देशभरात त्याचे वितरण करणार आहे. 

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्डस् कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) नुकतेच भारतामध्ये अँटीबॉडी कॉकटेलसाठी आपत्कालीन वापरासाठीचा परवाना दिला होता. या औषधाला यूएस आणि विविध ईयू देशांमध्ये देखील ईयूए मिळाले आहे. हे अँटिबॉडी कॉकटेल कोरोनाव्हायरस आजाराच्या (कोव्हिड-19) प्रौढ आणि बाल वयोगटातील (12 वर्षे व त्याहून मोठ्या व ज्यांचे वजन किमान 40 किग्रॅ. असलेल्या) सार्स-कोव्ह-2 विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्‍चित निदान झालेल्या आणि ज्यांच्याबाबतीत कोव्हिड-19 ची तीव्र लक्षणे विकसित होऊ शकतात अशा उच्च धोका असणार्‍या गटातील व ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांमध्ये आढळून येणार्‍या आजाराच्या सौम्य ते मध्यम लक्षणांवरील उपचारांसाठी वापरले जाणार आहे. या औषधामुळे अशा उच्च धोका असणार्‍या रुग्णांना त्यांची तब्येत ढासळण्यापूर्वीच लक्षणीयरित्या मदत होऊ शकणार असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच कॅसिरिव्हिमॅब आणि आयमडेव्हिमॅब यांच्यामुळे रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका 70 टक्के इतक्या लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे या पाहणीतून दिसून आले आहे. कॅसिरीव्हिमॅब आणि आयडेव्हिमॅब यांच्यामुळे लक्षणे जाणवण्याचा कालावधीही तब्बल चार दिवसांनी कमी झाल्याचेही दिसून आले आहे. भारतामध्ये अँटीबॉडी कॉकटेल  उपलब्ध झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे प्रमाण कमी करण्यास, आरोग्यसेवा यंत्रणांवरील भार कमी होण्यास मदत होऊ शकते, तसेच ते उच्च धोका असलेल्या रूग्णांची स्थिती अधिक खालावण्यापूर्वीच त्यांचा उपचार करण्यामध्ये मुख्य भूमिका बजावू शकते,” असे रोश फार्मा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. सिम्पसन इमॅन्युएल म्हणाले.

हे उत्पादन कुठे मिळू शकते?  
अँटीबॉडी कॉकटेल (कॅसिरिव्हिमॅब व आयमडेव्हिमॅब) देशभरात सिप्लाच्या वितरण नेटवर्कच्या माध्यमातून उपलब्ध असेल. खाजगी व सार्वजनिक आरोग्यसेवा संस्था त्यांच्या जवळच्या सिप्ला वितरकाशी संपर्क साधत चौकशी करू शकतात.
उत्पादनाची किंमत
प्रतिरूग्ण डोसची (1200 मिलीग्रॅमचा संयुक्त डोस (600 मिलीग्रॅम कॅसिरिव्हिमॅब व 600 मिलीग्रॅम आयमडेव्हिमॅब)) किंमत सर्व करांसहित 59,750 रूपये असेल. मल्टी-डोस पॅकसाठी (प्रत्येक पॅक दोन रूग्णांचा उपचार करू शकते) अधिकतम रिटेल किंमत सर्व करांसहित 119,500 रूपये आहे.