असा असेल दहावीच्या परीक्षेचा फॉर्म्यूला

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दहावीच्या गुणांचा मूल्यमापनांचा फॉर्म्युला सांगितला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्याविषयीचे धोरण तसेच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया याबाबतची घोषणा केली. 

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 1 जून रोजी पुढील सुनावणी होणार असून त्याअनुषंगाने आज शालेय शिक्षण विभागाने दहावीचे अंतर्गत मूल्यमापन आणि अकरावी प्रवेश याविषयीचे शासन निर्णय जारी केले. राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर कायम असून दहावीचा निकाल कसा जाहीर करणार, अकरावी प्रवेश कसे होणार याविषयी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन होणार असून त्यासाठी नववी, दहावीतील प्रत्येकी 50 गुण ग्राह्य धरले जातील. अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक प्रश्नांवर आधारित सीईटी होणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाच अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. दरम्यान, 10वी संदर्भात म्हणणे मांडण्यासाठी राज्य सरकारने  उच्च न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा अवधी मागितला.

कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे 24 विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

  • प्रत्येक विषयांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार
  • नववीच्या गुणाचे 50 टक्के गुण ग्राह्य धरणार
  • मूल्यमापनावर आक्षेप असल्यास कोरोनानंतर परीक्षा
  • अकरावी प्रवेशासाठी 2 तासांची सीईटी
  • दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सीईटी
  • लेखी मूल्यमापनासाठी 30 गुण, प्रात्यक्षिक मूल्यमापनासाठी 20 गुण
  • प्रत्येक विषयासाठी 100 गुणांचं मूल्यमापन
  • जून महिन्याच्या अखेरिस निकाल जाहीर करणार