डिस्चार्जपूर्वी कोव्हीड देयकांचे लेखा परीक्षण

नवी मुंबई ः खाजगी रुग्णालयांकडून कोव्हीड विषयक उपचारांच्या आकारण्यात येणार्‍या देयकांबाबत नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण कक्ष कार्यन्वित केला असून प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच रुग्णाचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयांकडून संभाव्य देयक घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे.

याबाबतचा आढावा घेताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हे कामकाज अधिक प्रभावीपणे व्हावे व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळावा याकरिता रूग्णालयामार्फत डिस्चार्जपूर्वी देण्यात येणार्‍या संभाव्य देयकांचे लेखा परीक्षण करण्यासाठी त्याच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने कोव्हीड उपचार करणार्‍या रुग्णालयामध्ये पालिकेचा अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश दिले. 15 मे रोजी याबाबतच्या विशेष बैठकीमध्ये आयुक्तांनी 1 एप्रिलपासूनच्या खाजगी रुग्णालयांमधील देयकांचे लेखा परीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. सदर कार्यवाही सुरु असून त्याबाबतचा आढावा आयुक्तांनी मंगळवारी बैठकीत घेतला. त्याचप्रमाणे रुग्णालयांकडून डिस्चार्जपूर्वी 48 तास आधी संभाव्य देयक मिळण्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेत संभाव्य देयकांचे लेखा परीक्षण करण्यासाठी रुग्णालयांमध्येच महानगरपालिकेचा अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. देयकांच्या पोस्ट ऑडिटपेक्षा प्री ऑडिट करणे रुग्णांच्या व नातेवाईकांच्या दृष्टीने आर्थिक हिताचे व सुविधेचे आहे हे लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये देयकांच्या लेखा परीक्षणासाठी अधिकारी नेमण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नियुक्त अधिकार्‍याने देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतरच रुग्णाच्या नातेवाईकांनी देयक अदा करावयाचे आहे. त्यास अनुसरून रुग्णालयांची बेड्स क्षमता लक्षात घेऊन तेवढ्या संख्येने अधिकार्‍यांची नेमणूक करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. कोव्हीड रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणी करताना कोव्हीडपश्चात निदान होणार्‍या म्युकरमायकोसिस वरील उपचारांचीही देयके तपासणी करावी असेही आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिसचे उपचार हे सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्येच होऊ शकतात हे लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा असणार्‍या रुग्णालयांनीच म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी दाखल करून घ्यावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

कुठे तक्रार कराल?
शासनाने खाजगी कोव्हीड रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍यांसाठी रुग्ण सुविधांचे दर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार देयके आकारणे रुग्णालयांना बंधनकारक असून त्याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या काही तक्रारी असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘कोव्हीड बिल तक्रार निवारण कक्ष’ येथे 022-27567389 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर तक्रार दाखल करावयाची असल्यास  cbccnmmconline.com या ई मेल आय डी वर अथवा 7208490010 या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठवाव्यात.